वेब न्यूज – छोटा रोबोट, मोठी झेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथील संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने कीटकाच्या आकाराच्या उडणाऱया रोबोटचा वेग आणि चपळता मोठय़ा प्रमाणात वाढवली आहे. या छोटय़ा यंत्रमानवाने अवघ्या 11 सेकंदांत सलग दहा कोलांटय़ा मारून दाखवल्या. त्याचा वेग आधीच्या प्रयोगांपेक्षा सुमारे 450 टक्क्यांनी वाढला, तर वेग वाढवण्याची क्षमता सुमारे 255 टक्क्यांनी सुधारली. या संशोधनाचे निष्कर्ष ‘सायन्स अॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.

एवढय़ा लहान यंत्राला वेगाने वळवणे किंवा हवेत फिरवणे सोपे नसते. हवेचा छोटासा झोत किंवा हालचालीतील किरकोळ चूकदेखील त्याचा मार्ग बदलू शकते. त्यामुळे संशोधकांनी रोबोटला दिशा आणि हालचाली ठरवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवी नियंत्रण प्रणाली तयार केली. या प्रणालीत दोन टप्पे आहेत. पहिला टप्पा रोबोटची हालचाल कशी होईल याचा अंदाज घेऊन योग्य मार्ग आखतो. दुसरा टप्पा त्या गणितातून शिकतो आणि प्रत्यक्ष उड्डाणाच्या वेळी अतिशय वेगाने निर्णय घेतो. त्यामुळे रोबोटला प्रत्येक हालचालीसाठी मोठय़ा संगणकीय गणनेची वाट पाहावी लागत नाही. प्रयोगात त्याने वाऱ्याचा अडथळा असतानाही ठरवलेल्या मार्गापासून फार कमी अंतराने उड्डाण केले. या तंत्रज्ञानाचा उपयोग भविष्यात भूपंपामुळे कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱयांमधील अरुंद फटी तपासण्यासाठी होऊ शकतो. मोठे ड्रोन जिथे पोहोचू शकत नाहीत, तिथे असे सूक्ष्म रोबोट जाऊ शकतील.

सध्या हे संशोधन प्रयोगांच्या टप्प्यात आहे. प्रत्यक्ष बचावकार्यात वापरण्यापूर्वी त्यावर कॅमेरे आणि सेन्सर बसवणे, बाहेरील वातावरणात स्वयंचलित उड्डाण करणे आणि रोबोटची सुरक्षितता तपासणे आवश्यक आहे. त्यामुळे ही यंत्रे लगेच बचाव पथकांचा भाग बनतील असे नाही. तरीही या तंत्रज्ञानामुळे भविष्यात शोधमोहीम आणि धोकादायक जागांची तपासणी अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे. अशी संशोधकांना आशा आहे.

स्पायडरमॅन