
चित्रपट निर्मिती ही सामूहिक गोष्ट. अनेक प्रकारच्या कला आणि तांत्रिक गोष्टी यांच्या सरमिसळीतून चित्रपट आकार घेत जातो. आणि त्यात कोणत्या गोष्टीमागे नेमकं काय असतं हे पटकन लक्षात येत नाही. रजनीकांतच्या चित्रपटांची जातकुळी काहीशी अतिरंजित साहसी गोष्ट अशी आहे. यासोबतच त्याची प्रतिमा बळकट करण्यात एखाद्या संगीतकाराचेही श्रेय आहे आणि ते संगीतकार म्हणजे देवा. रजनीकांतच्या चित्रपटाच्या श्रेयनामावलीचे पार्श्वसंगीत त्याच्या साहसी प्रतिमेनुसार असावं असा देवा यांनी ठेवलेला दृष्टिकोन यशस्वी ठरला आणि मग रजनीकांतच्या अनेक चित्रपटांचे संगीत आणि पार्श्वसंगीत यात देवा यांनी लक्षवेधक कामगिरी केली. रजनीकांतचे असे अनेक तेलगू, तामीळ भाषेतील चित्रपट हिंदी भाषेत डब करून प्रदर्शित झाल्याने त्या चित्रपटाचं श्रेयनामावली आणि चित्रपटाचं पार्श्वसंगीत तसेच संगीत अधिकाधिक चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचले. रजनीकांतच्या ‘बाशा’ वगैरे चित्रपटांचा त्यात समावेश होतो.
देवा यांनी चित्रपट संगीतात आणखी एक विशेष गोष्ट केली. त्यांनी तामीळनाडूची राजधानी चेन्नई (पूर्वीचे मद्रास) या शहरात लोकप्रिय असलेल्या ‘गाना’ या तामीळ ठेका असलेल्या गीत संगीताला चित्रपट संगीतात आणले. आणि तो स्थानिक कला प्रकार मुख्य प्रवाहात मिसळला.
देवा यांनी दक्षिणेकडील तामीळ, कन्नड, तेलगू आणि मल्याळम अशा प्रादेशिक भाषेतील तब्बल चारशे चित्रपटांना संगीत दिले. काही गाण्यांसाठी पार्श्वगायन केले. ते ‘तेनिसे थेंद्रल’ या नावाने ओळखले जात. याचा अर्थ ‘मधुर संगीताची झुळूक’. त्यांचे मूळ नाव देवानेसन चोक्कालिंगम. संगीतकार चंद्रा बोस यांच्याकडे 1973 साली वादक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. इलया राजा इत्यादी संगीतकारांकडे व्हायोलिन वगैरेचे वादन करून चित्रपट व्यवसायाची बरीचशी माहिती करून घेतली आणि 1986 सालच्या ‘मट्टूकारा मन्नारु’ या तामीळ चित्रपटापासून त्यांनी स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून वाटचाल सुरू केली. दक्षिणेकडील प्रत्येक प्रादेशिक भाषेत दरवर्षी शंभर-सवाशे चित्रपटांची निर्मिती होत असल्याने देवा यांना चांगल्या प्रमाणात संधी मिळाली. त्यात त्यांनी व्यावसायिकदृष्टय़ा काही वेगळे प्रयोगही केले. तामीळनाडू राज्य शासनाच्या वतीने त्यांना 1992 साली तामीळ कलामणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटात खुशी, आसाई, चायना राजा, इंग्लिशकरण, अन्नामलाई, काथल कोइई इत्यादी अनेक साऊथ इंडियन चित्रपटांना संगीत दिले. त्यातील अनेक चित्रपट हिंदीत डब करण्यात आले आणि ओटीटीवर पाहायला मिळताहेत. माध्यमे वाढली तशी चित्रपटांतील अनेकांच्या कला अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. देवा यांचे वयाच्या 76 व्या वर्षी चेन्नईत निधन झाले तेव्हा अनेकांना रजनीकांतच्या जुन्या चित्रपटातील श्रेयनामावलीत विशिष्ट शैलीतील संगीत आठवले.
दिलीप ठाकूर






























































