कॅलिफोर्नियात हिंदुस्थानी वंशाच्या नर्सची निर्घृण हत्या; पतीनेच रचला अपहरणाचा बनाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅलिफोर्नियामधून एक अत्यंत हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. हिंदुस्थानी वंशाची 30 वर्षीय नर्स आणि आठ महिन्यांच्या बाळाची आई असलेल्या जस्मिन गिल हिची तिच्याच पतीने अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नी बेपत्ता झाल्यानंतर तिचा खून लपवण्यासाठी 28 वर्षीय पती गुरिंदर गिल याने अमेरिकेच्या इमिग्रेशन एजंट्सनी तिला घरातून नेल्याचा बनाव रचला होता. मात्र, पोलिसांच्या कसून चौकशीत बिंग फुटले आणि पोलिसांनी पतीलाच खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे.

सॅक्रामेंटो काउंटी शेरीफ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जस्मिन आणि तिचा पती गुरिंदर यांच्यामध्ये घटस्फोटाची प्रकरणे सुरू होती आणि मुलांच्या ताब्यावरून दोघांमध्ये तीव्र वाद सुरू होता. यादरम्यान, जस्मिन शेवटची दिसल्यानंतर चार दिवसांनी, म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी तिच्या चुलत बहिणीने ती बेपत्ता झाल्याची अधिकृत तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा तपास सुरू असताना, गुरिंदरने पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी खोटी माहिती दिली. त्याने पोलिसांना सांगितले की, टपाल आणायला गेलेली जस्मिन हिला सॅक्रामेंटो येथील घराबाहेर ‘इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट’ (ICE) एजंट्सनी अटक केली होती आणि तेथून सोबत नेले होते.मात्र तपासादरम्यान गुप्तहेरांनी संबंधित तपास यंत्रणेशी संपर्क साधून पडताळणी केली असता, त्या निवासस्थानी किंवा परिसरात कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नसल्याचे स्पष्ट केले. शेरीफ कार्यालयाचे प्रवक्ते सार्जंट एडवर्ड इगो यांनी सांगितले की, जसजसा तपास पुढे सरकला, तसतसे गुरिंदरने दिलेल्या जबाबात आणि पुराव्यांमध्ये मोठ्या विसंगती आढळून आल्या. या गुन्ह्याला 1 ऑक्टोबर रोजी एक अत्यंत गंभीर वळण लागले, जेव्हा अधिकाऱ्यांना त्या जोडप्याच्या घरापासून सुमारे 70 मैल अंतरावर असलेल्या शेजारच्या एल डोराडो काउंटीमध्ये जळालेले आणि पुरलेले मानवी अवशेष आढळून आले. कसून तपासणी केल्यानंतर हे अवशेष जस्मिन गिल हिचेच असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 14 ऑक्टोबर रोजी पती गुरिंदर गिल याला अटक केली आणि त्याच्याशी संबंधित दोन घरांवर शोध वॉरंट बजावले. सध्या त्याला जामीन न देता कैदेत ठेवण्यात आले आहे.

आईच्या पावलावर पाऊल ठेवून नर्स बनलेली जस्मिन मूळची हिंदुस्थानात राहणारी होती आणि तिची आई अद्याप हिंदुस्राथानातच राहते. जस्मिनच्या पश्चात तिची आठ महिन्यांची चिमुकली मुलगी आहे. तिचे अवशेष तिच्या हिंदुस्थानात असलेल्या आईकडे सन्मानाने परत नेण्यासाठी आणि तिच्या आठ महिन्यांच्या बाळाच्या पालनपोषणासाठी स्थानिक स्तरावर ‘GoFundMe’ ही मदत मोहीम सुरू करण्यात आली आहे. या निधी संकलनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून समर्थकांनी आतापर्यंत 21 हजार डॉलर्सहून अधिक निधी जमा केला आहे. जस्मिन स्वतःसाठी आणि आपल्या बाळासाठी एका उज्ज्वल भविष्यासाठी संघर्ष करत होती, ती घटस्फोटाच्या माध्यमातून नव्या आयुष्याची सुरुवात करू पाहत होती; परंतु दुर्दैवाने ती आपले भविष्य घडवण्यापूर्वीच तिची हत्या करण्यात आली.