
जाऊ शब्दांच्या गावा
साधना गोरे
107 मराठीप्रेमींनी आपल्या प्राणांची आहुती दिल्यानंतर 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याचा इतिहास आपल्या प्रत्येकालाच ठाऊक आहे. या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मंगल कलशाची स्थापन करून नव्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. राज्याची स्थापना ही तशी सांविधानिक घटना असली तरी हिंदू धर्मात मंगल कलशाला एक धार्मिक महत्त्व आहे. त्यासंबंधी पुराणातली कथा असं सांगते की, देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून चौदा रत्नं प्राप्त झाली, त्यांपैकी एक रत्न म्हणजे अमृत. हे अमृत ठेवण्यासाठी विश्वकर्माने तयार केलेलं भांडं म्हणजे कलश! तर अशी ही मंगल कलशाची गोष्ट पुढे कळस, कळसा, कळशी यांनाही आपल्यात सामावून घेताना दिसते.
‘कलश’ म्हटलं की, पाण्याने भरलेलं, ओल्या कुंकवाचं स्वस्तिक रेखलेलं पात्र, मुखाशी श्रीफळ, चहूबाजूंनी खोचलेली आंबा – नागवेलींची पानं असं चित्र आपल्या डोळ्यांसमोर सहज उभं राहतं. धार्मिक कार्यातील या कलशाला आणि त्याच्या सोबतच्या या वस्तूंना हिंदू संस्कृतीतील तत्कालीन जीवन पद्धतींना अधोरेखित करणारा काहीएक प्रतीकात्मक अर्थ आहे. धार्मिक रूढींना प्रतीकात्मक अर्थ असतो, त्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक प्रतीकात्मकता भाषेत – शब्दांत असते. मात्र भाषा ही आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झाल्यामुळे त्यातील प्रतीकांचे अर्थ आपल्या सहज लक्षात येत नाहीत.
इतक्या धार्मिक अर्थांनी वेढलेल्या ‘कलश’ शब्दाचं मूळ अर्थातच संस्कृत भाषेत आहे. ‘कलश’चे शब्दकोशातील अर्थ तांब्या, गडवा, धातूंचे – मातीचे भांडे, घागर, कळशी असे आहेत. ही विविध भांडी आकाराने लहानमोठी असली आणि ती बनवण्यासाठी लोखंड, तांबे, माती अशा वेगवेळ्या गोष्टींचा वापर होत असला तरी त्यांच्यामध्ये एका बाबतीत साम्य आहे, ते म्हणजे त्यांचा आकार. त्यांचा आकार साधारणपणे तळाशी पसरट आणि तोंडाकडे निमुळता असतो. भारतातील बऱयाच भाषांमधील ‘कलश’चा उच्चार संस्कृतशी फारच मिळताजुळता आहे. कश्मिरी, पंजाबी, गुजराती, उडिया आणि कन्नड या भाषांमध्ये ‘कलश’ असाच उच्चार केला जातो. बंगालीमध्ये कलश – कलशि, सिंधीमध्ये कलशु(सु), असामीमध्ये कलह – कलचि असे दोन उच्चार केले जातात. तर तामीळमध्ये कलसम्, मल्याळी आणि तेलुगू या भाषांमध्ये कलशम् असा उच्चार होतो. विशेष म्हणजे लॅटिन, ग्रीक या प्राचीन भाषांतील प्याला म्हणजे ग्लास या अर्थाचे उच्चारही ‘कलश’शी साधर्म्य असणारे आहेत. लॅटिनमध्ये तो calix ( कॅलिक्स) तर ग्रीकमध्ये chulix (उच्चार उपलब्ध होऊ शकला नाही) असा आहे.
पुराण कथेतील एक संदर्भ असाही आहे की, देव आणि दानवांनी मंदार पर्वाताला रवी आणि सर्पांचा राजा वासुकीला दोरी समजून कलशरूपी समुद्राची घुसळण केली. ‘गीर्वाणलघुकोशा’त ‘कलश’चे अर्थ समुद्र, घुसळण्याची रवी असेही दिलेले आहेत. या अर्थांना समुद्रमंथनाचा हा संदर्भ असू शकेल. शिवाय ‘कलश’चं एक रूप म्हणजे कळशी. हा ‘कळशी’ शब्द संस्कृतमधीलच ‘कलशिः’ या शब्दापासून आला आहे. ‘गीर्वाणलघुकोशा’तच ‘कलशिः’चा एक अर्थ रवी घुसळण्याचं भांडं असा आहे. या अर्थाशीही वरील संदर्भ ताडून पाहता येईल.
शुभप्रसंगी मंगल कलश म्हणून नावाजलेल्या या भांडय़ाची विविध रूपं पाहायला मिळतात. रोजचं पाणी साठविण्यासाठी असतो तो माठ, नवरात्रीत घट, संक्रांतीचं सुगडं, अक्षयतृतीया आणि लग्नप्रसंगी करा, दहीहंडीला हंडी, अंत्यविधीसाठी मडके अशी त्यांची नावं सांगता येतील. मात्र मंगल कलशाशिवायची त्याची ही विविध रूपं अजून तरी आपण मातीचीच वापरतो. मंगल कलश मात्र सोने, चांदी, तांबे अशा धातूंचा वापरला जातो. आता तर कलशावरील श्रीफळ आणि आंब्यांच्या पानांसहित तांब्या-चांदीचे चकचकीत मंगल कलश बाजारात पाहायला मिळतात.
लग्नप्रसंगी वापरला जाणारा कलश ‘करा’ किंवा ‘कऱहा’ या नावानं ओळखला जातो. ‘करा’ हा शब्द संस्कृतमधील ‘करकः’ या शब्दापासून तयार झाला आहे. लग्नप्रसंगी नारळासहित कलश, हळदी – कुंकवाचं पंचपाळं इ. साहित्य असलेलं कऱह्याचं ताट घेण्याचं काम मुलाच्या आणि मुलीच्या बहिणीकडे असते. कऱह्याचं ताट सांभाळणारी म्हणून लग्नात नवरानवरीच्या बहिणींना ‘करवली’ म्हटलं जातं. संस्कृतमधील ‘करकवान्’ ते प्राकृत ‘करअवल’ असा प्रवास करत मराठीत त्याचं रूप ‘करवली’ झालं आणि मग कऱह्याचं ताट सांभाळत नसला तरीही ‘करवला’ असं त्याचं पुल्लिंगी रूप व्हायला असा कितीसा वेळ!
‘कलश’च्या साखळीतील कळस, कळसा ही रूपं पुढील लेखात पाहू.





























































