
>> अरुण
खूप वर्षांपूर्वी मुंबईबाहेरच्या जवळच्याच लोकल स्टेशनांवर मधोमध जतन केलेली मोठी झाडं किंवा काही फुलझाडंही दिसायची. त्यापैकी एका स्टेशनवरच चाफ्याचे झाड आठवतंय. मर्यादित पानं आणि टोकाला भरपूर फुलं असलेलं हे झाड भरउन्हातही टवटवीतपणे ‘ऊन पीत’ उभं असायचं आणि ऊन पिऊन सर्वत्र सुगंध पसरवायचे. चाफा किंवा वनस्पतीशास्त्रात ‘मॅन्गोलिका चम्पका’ म्हणून नोंदलं गेलेलं हे झाड मुळातच उष्ण कटिबंधातलं आणि ब्युनिद किंवा आर्द्र वातावरणात फुलणारं. भरपूर उष्णता सहन करून सुगंध देणारं, खरं तर ते उष्ण वातावरणातच अधिक बहरतं. अगदी 40 ते 42 अंश सेल्सियस तापमानापर्यंत त्याला काही त्रास होत नाही. त्याहून जास्त उन्हाळा असेल आणि वेळेवर पाणी मिळालं नसेल तर कोणतंही झाड सुकणारच.
परंतु कॅक्टस आणि सॅक्युलॅन्ट प्रजातीची बरीच झाडंझुडपं ऊन सोसून तग धरतात. आपल्याकडेही ऑक्टोबर हीटमध्ये किंवा मे महिन्याच्या उन्हाळय़ात शेताच्या बांधावरचे निवडुंग हिरवे असतात. त्यांची उक्रांतीच तशी झालेली असते. पाणी मिळतं तेव्हा ते साठवण्याची नैसर्गिक यंत्रणा आणि सूर्यप्रकाश अधिकाधिक परावर्तित करून उष्णतेपासून बचाव करण्याची क्षमता त्याना निसर्गाने बहाल केलेली असते. त्यामुळे दुष्काळात इतर झाडं बेहाल होतात तेव्हा या प्रजातींच्या झाडाझुडुपांना कमीत कमी त्रास होतो.
याशिवाय आपल्या माहितीतली आणि औषधी उपयुक्तता असलेलीही अनेक झाडं किंवा पिंपळ, वड, कडुलिंब यासारखे वृक्ष उन्हाळा सहन करू शकतात. चिंचेचे झाड किंवा बाभूळचं झाड अथवा अर्जुनवृक्ष जर न्याहाळला असेल तर त्यांच्या खोडांचा घेर मोठा असलेला दिसेल. भरगच्च पर्णसंभार त्यांच्या मुळातली जमीन, सावलीमुळे थंड ठेवतोच, पण खोलवर गेलेली मुळंसुद्धा भूमिमध्ये दडलेला ओलावा खेचून वर झाडाच्या संवर्धनाकडे पाठवतात. त्यामुळे उन्हाळय़ाच्या काळातही अशी झाडं शीतलता देतात.
आता चाफ्याप्रमाणे उष्णता सहन करून फुलणाऱया काही जागतिक फुलांमध्ये झिनिअॅस, मॉस, रॉझ, निन्का, मेरीगोल्ड, सेलोसिआ ब्लॅन्केट फ्लॉवर आणि आपल्या नेहमीच्या परिचयातली जास्वंदीची फुलं अशी कितीतरी आहेत. त्यातलं चाफा आणि जास्वंदीची फुलं थोडा शोध घेतला तर सध्या उन्हातही कुठेतरी दिसतील. तापत्रयामध्ये मनाला थंडावा देतील.





























































