परीक्षण – अध्यात्माचा सुरेख संगम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< अतुल जोशी

‘एक भूवैज्ञानिकाची भ्रमणगाथा’ हे पुस्तक म्हणजे दत्त संप्रदायातील अधिकारी व्यक्तिमत्त्व डा. प्रदीप ऊर्फ बाबासाहेब तराणेकर यांच्या ‘वैदिक भूगर्भ विज्ञान’ या विषयावरील प्रबोधनात्मक प्रवचनांचा संग्रह म्हणता येईल. बाबासाहेब तराणेकर हे इंदूर येथील प्रसिद्ध आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व श्री. नानामहाराज तराणेकर यांचे नातू. त्यांच्या अ. भा. त्रिपदी परिवाराचे ते प्रमुख आहेत. आजोबांचा आध्यात्मिक वारसा ते पुढे चालवीत आहेत. ही झाली त्यांची आध्यात्मिक बाजू, परंतु शिक्षण आणि पेशाने वैज्ञानिक ही त्यांची दुसरी बाजू आहे. शासकीय सेवेत भूवैज्ञानिक म्हणून दोन दशकांपेक्षा जास्त काळ काम केल्यावर त्यांनी ‘पर्यावरण भूविज्ञान’ या विषयात पीएचडी प्राप्त केली. नंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली. तेव्हापासून डा. बाबासाहेब तराणेकर यांनी त्यांचे विहीत कार्य सांभाळत भूगर्भविज्ञान या क्षेत्रात मोलाचे संशोधन केले आहे. अजूनही ते सुरूच आहे.

वैदिक भूगर्भ विज्ञान या विषयात त्यांचे कार्य प्रचंड आहे. ‘वैदिक भूगर्भविज्ञान अष्टांग संहिता’ या मूळ संस्कृत ग्रंथातील काही निवडक सूत्रांवर अनेक प्रबोधनात्मक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. या व्याख्यानांमध्ये वैदिक सूत्रांसोबत आधुनिक जिओलाजीच्या विशिष्ट शाखांच्या ग्रंथांचा परामर्श त्यांनी घेतला आहे. याच व्याख्यानांचा संग्रह म्हणजे बाबासाहेबांचा ‘वैदिक भूगर्भ विज्ञान विमर्श’ हा ग्रंथ. त्याच पद्धतीने ‘एका भूवैज्ञानिकाची भ्रमणगाथा’ या पुस्तकात डा. बाबासाहेब तराणेकर यांच्या ‘वैदिक भूगर्भ विज्ञान’ या विषयावरील प्रबोधनाचा समावेश आहे. कोरोना काळात (2019-20) अ. भा. त्रिपदी परिवार आणि श्री शांतीपुरुष सेवा संस्थेचे सर्व कार्यक्रम स्थगित झाले होते. त्यावेळी ‘चैतन्यपीठ’ या स्वतंत्र यूट्यूब चानलच्या माध्यमातून परिवारातील भाविकांसाठी विशिष्ट विषयांवरील बाबासाहेबांची प्रबोधनात्मक व्याख्याने आयोजित केली गेली.

अशा निवडक प्रबोधनांचा शब्दबद्ध संग्रह म्हणजे ‘एका भूवैज्ञानिकाची भ्रमणगाथा.’ प्रत्येक प्रबोधन ‘पुष्पा’च्या स्वरूपात त्याच्या सारांश किंवा गर्भितार्थासह पुस्तकात मांडण्यात आले आहे. यासोबतच एक अत्यंत अभिनव प्रयोगही येथे करण्यात आला आहे. प्रत्येक ‘पुष्पा’च्या अखेरीस एक ‘क्यूआर’कोड देण्यात आला आहे. तो स्कॅन करून इच्छुकांना बाबासाहेबांच्या त्या प्रबोधनाचा श्रवणानंदही घेता येईल. वैदिक भूगर्भ विज्ञानसारखा विषय हे पुस्तक आणि यूट्यूब चानेल या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाला आहे, हे मोलाचे काम करणाऱ्या राजीव हिंगवे यांचे कौतुक करावेच लागेल. राजीव हिंगवे हे स्वतः प्रख्यात बांधकाम व्यावसायिक आहेत आणि डा. बाबासाहेब तराणेकर यांचे निस्सीम भक्त आहेत. ‘श्री शांतीपुरुष’ मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.

‘एका भूवैज्ञानिकाची भ्रमणगाथा’ हे पुस्तक आणि त्यातील बाबासाहेब तराणे यांच्या वैज्ञानिक कर्तृत्वाचे पैलू आज वाचकांसमोर आले आहेत. ते राजीव हिंगवे यांनी ते शब्दबद्ध केले म्हणून. प्रत्येक ‘पुष्प’ अत्यंत माहितीपूर्ण आणि वैदिक विज्ञान वैदिक भूगर्भ विज्ञान याबाबत नावीन्यपूर्ण माहिती देते. वैदिक परंपरेत ‘स्थापत्यवेद’ अशी एक शाखा मांडली गेली आहे. या वेदांचा जाणकार तो स्थपती (म्हणजे विश्वकर्मा). त्याला सहाय्य करणारे तक्षक आणि वर्धकी, मूळ यजुर्वेदातील ‘रुद्राध्याया’त ‘स्थपती’, ‘तक्षक’ आणि मग ‘रक्षकार’, ‘कर्मार’ असे शब्द, त्यात असलेला खनिजांचा उल्लेख, कश्यप संहितेतील शिल्पज्ञ, देवज्ञ, विधिज्ञ, पौंड, नृकर या संज्ञा अशी उत्कंठावर्धक माहिती पुस्तकात दिसते. भृगू ऋषींनी सिव्हिल, मायनिंग, इंजिनीअरिंग या मुख्य शाखांसाठी उपयोगात आणलेले शिल्पशास्त्र, भूकंपाचे पूर्वानुमान अचूकपणे करण्याचे शास्त्र आणि तंत्र विकसित करणारा वराह मिहीर, भूजल आणि खनिकर्म सांगणारे शास्त्र म्हणजे ‘दकार्गलम्’ अशी विविध प्रकारची माहिती सखोल आणि आवश्यक तपशिलासह आहे.

वराह मिहिरांनी बृहत्संहितेमध्ये भूकंपविषयक माहिती विस्तृतपणे दिली आहे. त्यातील ‘भूकंप लक्षणाध्याय’ याबाबतही बाबासाहेबांनी सविस्तर विवेचन केले आहे. शिवाय बृहत्संहितेमध्येच खनिकर्म आणि भूजल याविषयी ‘जिऑलॉजी’शी संबंधित माहिती आहे, पाणी विषयावर वेगवेगळे आठ अध्याय कसे आहेत, त्यातील एका ‘ग्रह वर्षफल अध्याया’त येणाऱ्या वर्षभरात पाऊस कसा पडणार, याचा तपशील आहे.

वराहमिहिर सांगतात की, ज्या वाराने नवीन वर्षाची सुरुवात होत असेल त्या वाराचा जो स्वामी असेल तो त्या वर्षाचा राजा समजला जातो. हा दिवस जर रविवार असेल तर सूर्य हा त्या वर्षाचा राजा होईल. त्यावरून त्या वर्षात पाऊस, धनधान्य कसे असेल, याची सविस्तर माहिती मिळते. त्याचप्रमाणे ‘रसचण्डांशु’ या ग्रंथात आजच्या ‘मेटल’ (धातू) आणि ‘मेटलर्जी’ (धातूशास्त्र) याविषयी दिलेल्या माहितीचाही छान उहापोह आहे. सहजसोप्या, सुटसुटीत भाषेमुळे हे पुस्तक म्हणजे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सुरेख संगम आणि वाचकांना वैदिक विज्ञानाचा परिचय करून देणारे उद्बोधन म्हणता येईल.

एका भूवैज्ञानिकाची भ्रमणगाथा
लेखक ः राजीव हिंगवे
प्रकाशन ः नचिकेत प्रकाशन, नागपूर
पृष्ठे ः 128, मूल्य ः 200 रु.