आणखी एका देशात सरकारविरोधात विद्यार्थ्यांचा उठाव; अल्बेनिया पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी, पीएमओ, सरकारी इमारती, बँकांना आगी लावल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल्बेनियामध्ये महागडे शिक्षण आणि खराब सुविधांविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले असून रस्त्यांवर उतरले आहेत. विद्यार्थ्यांचे हे आंदोलन हिंसक झाले असून आंदोलक विद्यार्थ्यांनी पंतप्रधान एदी रामा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जोपर्यंत पंतप्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी घोषणा विद्यार्थ्यांनी केली आहे. आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान कार्यालय, सरकारी इमारती आणि अनेक बँकांना आगी लावल्या आहेत.

आक्रमक झालेल्या आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुराचा आणि पाण्याचा मारा केला. आंदोलक आणि पोलीस यांच्यात झालेल्या झटापटीत पोलीस व आंदोलक जखमी झाले आहेत. अल्बेनियामध्ये सरकारने शिक्षण प्रचंड महाग केले आहे. शिक्षणावर लाखो रुपये खर्च करूनही पदवी मिळवल्यानंतर नोकरी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात रोष वाढला आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतरही सरकार नोकऱ्या देत नाही. त्यामुळे हा सर्व संताप आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. सध्याची निदर्शने अनेक महिन्यांपासून दडपून ठेवलेल्या संतापाचा परिणाम आहेत. विद्यार्थी आणि तरुण सुमारे तीन महिने शांततापूर्ण निदर्शने करत होते. मात्र त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले गेले नाही.

पंतप्रधानांची ट्रम्प यांच्या जावयावर मेहेरबानी

एदी रामा हे 2013 पासून अल्बेनियाचे पंतप्रधान आहेत. गेल्यावर्षी मे महिन्यात त्यांनी चौथ्यांदा पंतप्रधानांची शपथ घेतली. सध्याची आंदोलने ही रामा यांच्याविरोधातील सर्वात गंभीर आंदोलन आहेत. सरकारविरोधातील आणखी एक कारण म्हणजे दक्षिण किनाऱ्यावर लक्झरी रिसॉर्ट उभारण्याची योजनाही आहे. हे रिसॉर्ट डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांचे आहे.

सरकारने चर्चा न केल्याने संतापाचा भडका

विद्यार्थ्यांच्या मागण्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारने चर्चा करण्याऐवजी अनेकदा विद्यार्थ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता लोकांचा संताप सरकारविरोधात वाढला आहे. सरकारी संस्थांमधील उत्तरदायित्वाचा अभाव आणि लोकांच्या तक्रारींवर कारवाई न होणे यामुळेही सरकारविरोधात नाराजी वाढली आहे.

11 देशात आंदोलने सुरू

हिंदुस्थान, फ्रान्स, इटली, अल्बेनिया, बेल्जियम, स्पेन, जर्मनी, ग्रीस, चिली, ब्राझील, कोलंबिया या 11 देशात आंदोलने सुरू आहेत. हिंदुस्थानात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. तर अन्य देशांमध्ये विविध मागण्यांसाठी हजारो लोक रस्त्यांवर उतरले आहेत.