
<< दुष्यंत पाटील
[email protected]
मायकेलएंजेलोच्या प्रसिद्ध ‘पिएता’ या शिल्पाप्रमाणे भासणारे ‘द डेथ ऑफ मारा’ हे पॅरिसमधील दाव्हिद या चित्रकाराचे चितारलेले चित्र फ्रेंच क्रांतीचा वेगळा चेहरा दर्शवते. 1789 मध्ये फ्रेंच जनतेनं वर्षानुवर्षे अन्याय करणाऱ्या राजेशाहीविरुद्ध बंड पुकारलं. ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता’ या घोषणांनी पॅरिस दुमदुमून गेलं, पण राजेशाही संपल्यानंतर क्रांतीचा मार्ग शांततेचा राहिला नाही, तो रक्ताच्या दलदलीत रुतला.
क्रांतिकारकांमध्येच दोन गट पडले. यातला पहिला होता रोबेस्पिएर आणि ज्याँ-पॉल मारा यांच्या नेतृत्वाखालचा जॅकोबिन नावाचा अतिरेकी कट्टर गट. यांचं म्हणणं होतं की, क्रांती टिकवण्यासाठी संशयित वाटणाऱ्या प्रत्येकाचा गळा कापला पाहिजे. याउलट जिरोन्डिन या मवाळ गटाला वाटायचं की, आता हिंसाचार थांबवला पाहिजे आणि कायद्याचं राज्य आलं पाहिजे. या दोन गटांमधला वाद विकोपाला गेला. जॅकोबिन गटानं सत्ता हातात घेतली आणि रोज शेकडो निष्पापांचं हत्याकांड सुरू झालं. पॅरिसच्या रस्त्यांवरून रक्ताचे पाट वाहायला लागले. कोणी कोणावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. घरातल्या नोकरानं मालकाविरुद्ध साधी संशयाची तक्रार केली तरी दुसऱ्या दिवशी त्या मालकाचं मुंडकं धडावेगळं केलं जायचं!
जॅकोबिन नेता ज्याँ-पॉल मारा एक हुशार डॉक्टर आणि शास्त्रज्ञ होता, पण क्रांती सुरू झाल्यावर तो एक जहाल, आग ओकणारा पत्रकार बनला. त्यानं ‘लमी द्यु पॉपल’ (जनतेचा मित्र) नावाचं एक वर्तमानपत्र सुरू केलं. माराचे लेख म्हणजे अक्षरशः पेट्रोलच्या टाक्यांवर फेकलेल्या पेटत्या काड्यांसारखे असायचे. तो आपल्या वर्तमानपत्रातून उघडपणे याद्या छापायचा आणि लिहायचा, ‘हे लोक क्रांतीचे गद्दार आहेत, यांना तत्काळ फाशी द्या!’ त्याच्या एका शब्दावर पॅरिसचे हजारो गरीब मजूर रस्त्यावर उतरायचे आणि कत्तली करायचे!
माराला त्वचेचा एक अत्यंत भयंकर, वेदनादायी आजार झाला होता. या आजारामुळे त्याच्या संपूर्ण अंगाची असह्य आग व्हायची आणि सतत खाज सुटायची. या वेदनेतून आराम मिळवण्यासाठी तो औषधी वनस्पती आणि व्हिनेगर मिसळलेल्या कोमट पाण्याच्या बाथटबमध्ये तासन्तास बसून राहायचा. त्यामुळे मारानं आपल्या बाथटबलाच आपलं ऑफिस बनवलं होते. बाथटबवर लाकडी फळी ठेवून तो तिथूनच दिवस-रात्र आपल्या वर्तमानपत्रासाठी जहाल लेख लिहायचा आणि मृत्यूच्या वॉरंटवर सह्या करायचा.
13 जुलै 1793 रोजी नॉर्मंडी प्रांतातून एक 24 वर्षांची देखणी तरुणी पॅरिसमध्ये आली. तिचं नाव होतं शार्लट कॉर्डे. ती मवाळ जिरोन्डिन विचारांची समर्थक होती. फ्रान्समधल्या हिंसाचाराला मारा जबाबदार आहे, असं तिला वाटायचं. जर माराला संपवलं, तर फ्रान्समध्ये पुन्हा शांतता नांदेल, असा तिचा विश्वास होता! शार्लट कॉर्डेनं एक साधा लाकडी मुठीचा स्वयंपाकाचा सुरा विकत घेतला. ती माराच्या घराबाहेर पोहोचली. सुरुवातीला माराच्या पत्नीनं तिला घरात घेण्यास नकार दिला, पण शार्लटनं निरोप पाठवला ‘माझ्याकडे नॉर्मंडीमधील क्रांतीच्या गद्दारांची गुप्त यादी आहे, जी मला फक्त माराच्याच हातात द्यायची आहे.’
गद्दारांची नावं ऐकण्यासाठी उतावीळ झालेल्या मारानं तिला आपल्या बाथरूममध्ये बोलावले. मारा बाथटबमध्ये बसलेला होता. शार्लट कॉर्डे आत आली आणि तिनं त्याचा खून केला. शार्लट कॉर्डे तिथून पळून गेली नाही, ती शांतपणे तिथेच उभी राहिली. पोलिसांनी तिला पकडलं आणि चारच दिवसांनी तिला गिलोटिनवर चढवण्यात आले. माराच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी संसदेत शोकसभा भरली आणि माराच्या हौतात्म्य दाखवणारं चित्र काढण्याची जबाबदारी दाव्हिदवर आली आणि मग ‘द डेथ ऑफ मारा’ ही विश्वविख्यात चित्रकृती बनली.
दाव्हिद हा माराचा जवळचा मित्र होता. हत्या होण्याच्या अवघ्या 24 तास आधी दाव्हिद स्वत माराला भेटायला त्याच्या घरी गेला होता. त्यामुळे प्रत्यक्ष घटनास्थळ कसं होतं, हे दाव्हिदला अचूक ठाऊक होतं, पण तरीही दाव्हिदनं चित्रात अनेक गोष्टी मुद्दाम बदलल्या आणि काही गोष्टी लपवून ठेवल्या. कारण त्याला एका क्रूर, आजारी माणसाला ‘क्रांतीचा येशू ख्रिस्त’ बनवायचं होते. त्यानं चित्रात माराचं शरीर एखाद्या प्राचीन ग्रीक देवतेसारखं नितळ, सुंदर दाखवलंय. अंगावर एकही डाग नाही. दाव्हिदनं त्याच्या सर्व त्रुटी पुसून टाकल्या आणि त्याला एक देखणा, निष्पाप हुतात्मा बनवलं.
पाश्चात्त्य कलेमध्ये मायकेलएंजेलोचं प्रसिद्ध ‘पिएता’ हे शिल्प प्रसिद्ध आहे, यात येशूचा एक हात खाली लटकलेला आहे. दाव्हिदनं तोच धार्मिक फॉर्म्युला इथे वापरला. माराचा खाली लटकलेला उजवा हात आणि त्याच्या चेहऱ्यावर हुबेहूब येशू ख्रिस्तासारखी शांतता दाखवली. ज्याप्रमाणे येशूनं संपूर्ण मानवजातीच्या पापांसाठी स्वतचं रक्त सांडले, अगदी त्याचप्रमाणे मारानं फ्रान्सच्या गरीबांच्या कल्याणासाठी स्वतच्या रक्ताचा शेवटचा थेंब अर्पण केला, असा छुपा संदेश त्यानं या चित्रामधून दिला.
या संपूर्ण चित्रात खुनी शार्लट कॉर्डे कुठेही दिसत नाही. कारण त्यामुळे लोकांच्या मनात तिच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली असती. अतिशय परिणामकारकरीत्या राजकीय हेतू साध्य करणारं हे चित्र कलेच्या इतिहासात अजरामर झालं.


























































