
हिंदुस्थान ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) कारभाराची सूत्रे कोणाच्या हाती जाणार याचा फैसला 5 डिसेंबरला होणार आहे. संघटनेच्या नव्या कार्यकारी परिषदेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून विद्यमान अध्यक्ष पी. टी. उषा पुन्हा मैदानात उतरणार का, याबाबत क्रीडा वर्तुळात उत्सुकता आहे. मात्र त्यांनी पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.
विद्यमान कार्यकारी परिषदेचा कार्यकाळ संपण्याच्या पाच दिवस आधी नवी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या निवडणुकीच्या देखरेखीसाठी दिल्ली आणि चंदिगडचे माजी निवडणूक आयुक्त संजय कुमार श्रीवास्तव यांची निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारी परिषदेबरोबरच खेळाडू आयोगाच्या निवडणुकीचाही कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
3 नोव्हेंबरला खेळाडू आयोगाची निवडणूक
‘आयओए’च्या खेळाडू आयोगासाठी 3 नोव्हेंबरला मतदान, मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे. या आयोगात पाच पुरुष आणि पाच महिला असे एकूण दहा निवडून आलेले खेळाडू असतील. विविध क्रीडा स्पर्धांतील कामगिरी आणि पात्रतेनुसार खेळाडूंचे प्रतिनिधित्व निश्चित केले जाणार आहे. राष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या पात्र सदस्यांना त्यांच्या विधिवत स्थापन केलेल्या खेळाडू आयोगांच्या माध्यमातून दोन खेळाडू प्रतिनिधींची नावे 11 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत सादर करायची आहेत.
पी. टी. उषा यांचा सुशासनावर भर
‘आयओए’च्या अध्यक्ष पी. टी. उषा यांनी निवडणूक प्रक्रियेला पारदर्शकता, सुशासन बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हटले आहे. खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवणारी, विश्वासार्ह आणि सक्षम क्रीडा प्रशासन व्यवस्था उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रिया स्वतंत्र आणि पारदर्शक पद्धतीने पार पडण्यासाठी संघटना आवश्यक सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.























































