उद्या मी असेन की नाही माहीत नाही… नानांचा शेवटचा व्हिडीओ होतोय व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

अभिनेते नाना पाटेकर यांनी 4 ऑक्टोबरला गोव्यातील ‘सम्राट क्लब इंटरनॅशनल’च्या पदग्रहण समारंभाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी मित्र आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. या भाषणादरम्यान ‘उद्या मी इथे असेन की नाही हे मला माहीत नाही’ असे उद्गार नानांनी काढले होते. त्यानंतर चार दिवसांत नानांनी जगाचा निरोप घेतल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.

भाषणात नाना म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर माझे मित्र होते. त्यांना मित्र म्हणताना मला अभिमान वाटायचा. ते माझ्यापेक्षा वयाने लहान होते, पण त्यांचे मोठेपण इतके मोठे होते. आपल्या देशात अशा व्यक्तीचा जन्म झाला आणि त्यांनी देशासाठी, समाजासाठी कार्य केले हे आपले नशीब होते. ते एका ध्येयाने झपाटलेले होते. वसा घेतल्यासारखी जगलेली माणसे आहेत. इतक्या अल्प आयुष्यात इतके सगळे करून जाणे किती मोठी गोष्ट आहे,’’ असे नाना पाटेकर या कार्यक्रमात म्हणाले होते. ‘‘आपल्या सर्वांनाच कधी ना कधी जावे लागणार आहे. उद्या मी इथे असेन की नाही हे मला माहीत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा तो एक काळ येणारच, पण त्यापूर्वी मी स्वतःला विचारले पाहिजे, मला जे करायचेय ते मी करू शकतोय का?’’ असेही नाना या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.

…तर मी कधीच रंगमंचावर उभा राहू शकलो नसतो

या भाषणात आपल्या अभिनय कारकीर्दीचे संपूर्ण श्रेय नाना यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सुलभाताई यांना दिले. नाना म्हणाले, ‘‘त्या गर्दीत बसलेल्या माझ्याकडे पाहून, हा भूमिका करू शकेल असा विश्वास सुलभाताईंनी दाखवला. त्यावेळी त्यांनी मला संधी दिली नसती, तर मी कधीच रंगमंचावर उभा राहू शकलो नसतो, अशी कृतज्ञतेची भावना त्यांनी व्यक्त केली होती. याच संवादात त्यांनी आपल्या पहिल्या नाटकाची आणि त्याला मिळालेल्या यशाची आठवण सांगितली. राज्य नाटय़ स्पर्धेत नानांच्या नाटकाला मोठे यश मिळाले होते. स्वतः नानांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर सुलभाताईंची बहीण मच्छूताई यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कारच आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरल्याचे नानांनी म्हटले होते.