कुंभमेळ्यात डुबकी मारण्यापेक्षा बळीराजाच्या पाठीशी उभे राहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने कंत्राटदारांची देणी थकली आहेत. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या करत असताना नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी तब्बल 35 हजार कोटी रुपयांची उधळपट्टी करायला हे सरकार निघाले आहे. कोटय़वधी रुपये खर्च करून कुंभमेळ्यात डुबकी मारण्यापेक्षा संकटात सापडलेल्या बळीराजाच्या पाठीशी उभे राहा आणि त्याचे प्राण वाचवा, असा संताप कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

राज्यातील दुष्काळी स्थिती, कर्जमाफी, दहा लाख कोटींचे कर्ज यावरून वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला. आधी दुनियाभराची पापे करायची आणि मग कोटय़वधी खर्चून कुंभमेळ्यात डुबकी मारायची, याने कसले पुण्य मिळणार? सरकारला खरेच पुण्य कमवायचे असेल तर दुष्काळी परिस्थितीत शेतकऱयांच्या मागे खंबीरपणे उभे राहून मदत सरकारने करावी, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली.