हिरो बनण्याच्या नादात तुझ्यातील कलाकाराला गमावू नकोस…; नाना पाटेकरांच्या आठवणीत शाहरुख झाला भावुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या सहकलाकारांकडून आणि जवळच्या मित्रांकडून जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. नानांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या प्रेमळ पण तितक्याच रोखठोक स्वभावाचा अनुभव घेतलेल्या शाहरुख खान म्हणजेच किंग खान याने सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहित त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नानांसोबतची पहिली भेट, त्यांचा सल्ला आणि कॅरमच्या खेळातील त्यांच्या रंगलेल्या मैफलीची आठवण या पोस्टमधून सांगितली.

नानांसोबतची पहिली भेट आठवताना शाहरुखने लिहिलं आहे, त्यावेळी नानांसमोर उभं राहिल्यावर मनात एक प्रकारचा आदर आणि दडपण होतं. त्या गोंधळात तो वारंवार केसांशी खेळत होता. हे पाहताच नानांनी त्याचा हात बाजूला केला आणि थेट सुनावलं, “हिरोसारखे केस बनवू नकोस… तू अभिनेता आहेस.” नानांचा हा स्वभावच वेगळा होता, असंही त्याने म्हटलं आहे. ते समोरच्याला खूश करण्यासाठी कौतुक करत नसत किंवा ऐकायला आवडेल ते सांगत नसत. उलट, समोरच्याला जे ऐकणं गरजेचं आहे तेच ते स्पष्टपणे सांगायचे. त्यांचा स्वभाव रोखठोक, रफ आणि प्रामाणिक होता; मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक सुंदर हास्यही होतं, अशी आठवण त्याने सांगितली.

नानांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धतही काहीशी वेगळी होती. “ते आधी तुमच्यावर ओरडायचे आणि तीन-चार टोमणे किंवा शिव्या झाल्यानंतर आपण त्यांच्या मिठीत असल्याचं लक्षात यायचं,” असं शाहरुखने लिहीलं आहे. नानांनी आपल्यावर खूप प्रेम केलं आणि आपणही त्यांच्यावर तितकंच प्रेम केलं, अशी भावनाही त्याने व्यक्त केली. नाना केवळ सहकलाकार नव्हते, तर ते आपले मार्गदर्शक, शिक्षक, समीक्षक आणि मित्र होते, असं शाहरुखने पोस्टच्या माध्यमातून म्हटलं आहे. विशेष म्हणजे, नानांना कॅरम खेळाचीही प्रचंड आवड होती. ते समोरच्यांना वारंवार हरवायचे आणि प्रत्येक विजयाचा मनमुराद आनंद घ्यायचे, अशी मजेशीर आठवणही या पोस्टमध्ये सांगण्यात आली आहे.

नानांना आठवताना शाहरुखने पुढे लिहिलं की, त्यांचा उत्साह, हशा, वेडेपणा आणि प्रेम कायम आपल्या आठवणीत राहील. “काश, आपल्याला आणखी काही संवाद करता आले असते, आणखी एक वाद घालता आला असता, पुन्हा एक कप चहा घेता आला असता आणि कॅरमचा आणखी एक डाव खेळता आला असता,” अशी हळवी भावना त्याने व्यक्त केली.

नानांच्या जाण्याने केवळ चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर त्यांच्या चाहत्यांच्या मनातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असंही त्याने म्हटलं. नानांनी दिलेला एक सल्ला मात्र आयुष्यभर मनात राहील, असं सांगताना त्याने लिहिलं, हिरो बनण्याच्या नादात तुझ्यातला अभिनेता हरवू नकोस.” पोस्टच्या शेवटी त्याने नानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत म्हटलं की, स्वर्गालाही त्यांच्या येण्याने समृद्धी लाभेल. एक जबरदस्त अभिनेता आणि अजिंक्य कॅरम चॅम्पियन म्हणून नाना कायम स्मरणात राहतील. “खूप लवकर निघून गेलात हिरो अॅक्टर… तुमची खूप आठवण येईल,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.