
हिंदुस्थानचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांची दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. गांगुली हे क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (सीएबी) अध्यक्षही आहेत. एकाच वेळी दोन पदे भूषवल्यामुळे हितसंबंधांचा संघर्ष निर्माण झाल्याचा वाद आता सुरू झाला आहे. पण गांगुली यांना मात्र हा वाद मान्य नाही. गांगुली यांनी सांगितले की, त्यांना लोकपालाकडून आदेश मिळाला आहे.
गांगुली काय म्हणाले
हितसंबंधांच्या संघर्षाच्या मुद्दय़ावर विचारले असता सौरव गांगुलींनी उत्तर दिले की, ‘माझ्याकडे लोकपालाकडून आदेश आहे. त्यामुळे यामध्ये हितसंबंधांचा कोणताच विषय येत नाही. त्यामुळे माझ्याबाबतची जी चर्चा सुरू आहे त्यामध्ये काहीही तथ्य नाही आणि कसलाही वाद नाही.’
गांगुलींबरोबर दुसऱयांदा हे घडतंय
गांगुलींची अशा विषयाला सामोरे जाण्याची ही पहिली वेळ नाही. 2019 मध्ये तत्कालीन बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी गांगुली यांना त्याच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारले होते. त्यावेळी गांगुली दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे सल्लागार होते आणि त्याचबरोबर क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्षही होते.






























































