
राजधानी दिल्लीत आज पुन्हा आंदोलनाचे तुफान उठले. देशातील भ्रष्ट निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधी पक्षाचे शेकडो खासदार सलग दुसऱया दिवशी रस्त्यावर उतरले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सर्व खासदारांनी जंतर मंतरच्या दिशेने कूच केले. पोलिसांनी त्यांना अडवल्यामुळे तणाव निर्माण झाला. जंतर मंतर येथे आंदोलनावर ठाम असलेल्या राहुल यांनी हटण्यास नकार दिला. प्रियंकांसह महिला खासदारांनी रस्त्यावर लोळण घेतली. ज्ञानू को जाना ही पडेगा… व्होट चोर गद्दी छोड… अशी घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी बळाचा वापर करत राहुल गांधी यांच्यासह सर्व खासदारांना उचलून व्हॅनमध्ये काsंबले.
भ्रष्ट निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या खासदारांनी मंगळवारी संसद भवन ते निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर मोर्चा काढला. मात्र, सरकारने पोलीस बळाचा वापर करून हा मोर्चा अडवला आणि खासदारांना ताब्यात घेतले. त्यानंतर आज राहुल गांधी यांनी जंतर मंतरवर आंदोलन करण्याची घोषणा केली. त्यानुसार खासदार जंतर मंतरकडे जाण्यास निघाले. मात्र, परवानगीशिवाय तिथे आंदोलन करता येणार नाही म्हणत पोलिसांनी पुन्हा त्यांना अडवले.
खासदारांचा पोलिसांना पुन्हा चकवा
सुरुवातीला राहुल गांधी यांच्यासह काही नेत्यांना ताब्यात घेऊन बसमध्ये बसवण्यात आले. इतर कार्यकर्त्यांना पकडण्यासाठी पोलीस गेले असता राहुल यांच्यासह सर्व खासदार बसमधून उतरले आणि त्यांनी रस्त्यावर ठिय्या दिला. जंतर मंतरवर जाणारच असा निर्धार त्यांनी केला. संविधान हाती घेऊन प्रियांका गांधी यांच्यासह अनेक महिला खासदार आंदोलनात होत्या. त्यांनी इतर महिला खासदारांसह रस्त्यावर लोळण घेतली. निवडणूक आयोगाविरोधात आणि सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी खासदारांसह इतर कार्यकर्त्यांना बळजबरीने बसमध्ये काsंबण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक बस कार्यकर्त्यांनी पंक्चर करून टाकली. आम्हाला जंतर मंतरवर जाऊ द्या, शांततेत आंदोलन करू द्या असे खासदारांचे म्हणणे होते. मात्र पोलीस ऐकण्यास तयार नव्हते. शेवटी पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह खासदारांना व कार्यकर्त्यांना फरपटत नेऊन ताब्यात घेतले. त्यांना बारखम्बा रोड पोलीस ठाण्यात नेण्यात आले व काही वेळानंतर सोडण्यात आले.
माझ्यावर 100 गुन्हे दाखल व्हावेत!
आकाशवाणी भवनात आंदोलन केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्यावर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. त्यावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. ‘माझ्यावर आधीच 45 एफआयआर दाखल झाले. त्यांची संख्या 100 व्हावी हे माझे लक्ष्य आहे. प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी मेडल आहे, असे राहुल म्हणाले. ज्ञानेश कुमार हे कायदेशीर निवडणूक आयुक्त नाहीत. मोदी, शहा, भागवतांनी देशाची लोकशाही संपवून टाकली आहे, अशी तोफ राहुल यांनी डागली.
आज पाळणार ’काळा दिवस’
शांततापूर्ण आंदोलन करू पाहणाऱ्या खासदारांविरोधात पोलीस बळाचा वापर करण्यात आल्याने काँग्रेस संतापली आहे. हा संविधानावरचा हल्ला आहे. याचा निषेध म्हणून काँग्रेस आज, 8 ऑक्टोबर हा ‘काळा दिवस’ पाळणार आहे. गुरुवारी देशभरात सरकारविरोधात आंदोलने व निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी घोषणा करण्यात आली.
प्रियंका गांधी यांचा रुद्रावतार
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचा रुद्रावतार आज पाहायला मिळाला. संविधान हाती घेऊन त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता त्यांनी रस्त्यावर ठिय्या दिला. हिंमत असेल तर हटवून दाखवा असे सांगत इतर महिला खासदारांसह रस्त्यावर ठाण मांडले.
काँग्रेसच्या आंदोलनानंतर ज्ञानेश कुमारांच्या आईने केले घराचे शुद्धीकरण
काँग्रेसने केलेल्या आंदोलनामुळे घर घाण झाल्याचे सांगत भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश पुमार यांच्या आई-वडिलांनी आपल्या घराचे शुद्धीकरण केले आहे. इतकेच नव्हे, शांततेसाठी धार्मिक विधीही केला. गंगाजल शिंपडून, सुंदरकांड पठण करून आणि कलश यात्रा काढून घर पवित्र करण्यात आले. त्यांच्या या कृतीमुळे एका वेगळ्याच सामाजिक वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अलीकडेच ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा येथील घरासमोर आंदोलन केले होते. ‘गद्दार ग्यानू, व्होट चोर…’ असे त्यांच्या घराच्या भिंतीवर लिहिण्यात आले होते. या आंदोलनामुळे घर अपवित्र झाल्याचा कांगावा करत सत्यवती गुप्ता आणि सुबोध कुमार गुप्ता यांनी घराचे शुद्धीकरण केले. अखिल भारतीय माथुर वैश्य महासभेने शुद्धीकरणात पुढाकार घेतला. आग्रा येथील राधाकृष्ण मंदिरापासून महिलांनी पिवळे वस्त्र परिधान करून कलश यात्रा काढली.

























































