
किल्ले रायगडावरील टकमक टोकावरून उडी मारून खेडमधील तरुणाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुयोग पांचाळ (वय – 37, रा. ठाणे, मूळ रा. खेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. टकमक टोकाच्या खाली निजामपूरच्या दिशेने सुमारे 800 फूट खोल दरीत त्याचा मृतदेह आढळून आला आहे.
सुयोग शनिवारी सकाळी किल्ले रायगडावर पोहोचला होता. त्याने चित्त दरवाजाजवळील रस्त्यावर आपली दुचाकी उभी केली. त्यानंतर टकमक टोकावर पोहोचून तेथील स्वतःचे फोटो त्याने पत्नीला पाठवले. पत्नीशी शेवटचा दूरध्वनी संपर्क झाल्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. त्यामुळे कुटुंबीयांकडून त्याचा शोध सुरू करण्यात आला.
सुयोग बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या भावाने महाड तालुका पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. मात्र, रात्रीची वेळ झाल्याने शनिवारी शोधकार्य थांबविण्यात आले. रविवारी सकाळी एसव्हीआरआरएस (SVRRS) रेस्क्यू टीमने स्थानिकांच्या मदतीने पुन्हा शोधमोहीम हाती घेतली.
ड्रोनच्या सहाय्याने टकमक टोकाच्या परिसरात शोध घेत असताना निजामपूरच्या दिशेने असलेल्या सुमारे 800 फूट खोल दरीत सुयोग याचा मृतदेह आढळून आला. रेस्क्यू टीम व स्थानिकांनी अथक प्रयत्नांनंतर मृतदेह दरीतून बाहेर काढला. या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



























































