मुंबई एअरपोर्टवरील २६५ उड्डाणे दि. बा. पाटील विमानतळावर फिरवणार, २५ ऑक्टोबरपासून नवी मुंबईत ट्रॅफिकचा जांगडगुत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील २६५ उड्डाणे दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत्या २५ ऑक्टोबरपासून फिरवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या रस्त्यांवर दररोज सुमारे ५० हजार गाड्यांची भर पडणार असून वाहतूककोंडी फोडताना पोलिसांच्या नाकीनऊ येणार आहे. ही आगाऊ वाहतूककोंडी लक्षात घेऊन नवी मुंबई पोलिसांनी नियोजनाला सुरुवात केली आहे.

मुंबई विमानतळावरील टर्मिनल एक हे दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या टर्मिनलवरून होणाऱ्या विमानांची काही उड्डाणे टर्मिनल दोनवर तर काही उड्डाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवण्यात येणार आहेत. सुमारे २६५ विमानांची उड्डाणे नवी मुंबईत वळवण्याचे नियोजन विमानतळ व्यवस्थापन कंपनीने सुरू केले आहे. ही उड्डाणे येत्या २५ ऑक्टोबरपासून नवी मुंबईत वळवण्यात आल्यानंतर शहरात मोठी वाहतूककोंडी होणार आहे. विमानतळावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्या सुमारे ५० हजार वाहनांची रस्त्यावर अतिरिक्त भर पडणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना मोठा वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार आहे. दोन दिवसांत पुन्हा बैठक
मुंबईच्या उपनगरांमधून नवी मुंबई विमानतळापर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या पर्यायाचाही विचार केला जात आहे. पुढील दोन दिवसांत या विषयाशी संलग्न सर्वच विभागांची एकत्रित बैठक घेऊन त्यातून प्रवाशांच्या सोयीचे नियोजन करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी व्यक्त केली आहे.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आयुक्तालयात वाहतूक नियोजनाबाबत बैठक घेतली. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्यासह विमानतळाला जोडणारे प्रमुख रस्ते, सध्या सुरू असलेली बांधकामे आणि वाहतूककोंडीची ठिकाणे यांचा बैठकीत आढावा घेण्यात आला.

नवी मुंबईतील सध्या सर्वच रस्त्यांवर वाहतुकीचा मोठा ताण वाढला आहे. त्यातच आता सुमारे ५० हजार हलक्या वाहनांची अतिरिक्त भर रस्त्यांवर पडणार आहे. त्यामुळे गव्हाण फाटा, किल्ले गावठाण चौक, बेलापूर, करंजाडे, उलवे, पळस्पे येथील कोनफाटा आणि कळंबोली सर्कल या ठिकाणच्या वाहतूककोंडीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

मुंबई उपनगरांतून थेट नवी मुंबई विमानतळापर्यंत सार्वजनिक बससेवा उपलब्ध झाल्यास खासगी वाहनांची संख्या कमी होण्यास मदत होईल का, या पर्यायावरही पोलिसांच्या बैठकीत चर्चा झाली.

एनएमएमटीकडून तरघर आणि खांदेश्वर रेल्वे स्थानकातून नवी मुंबई विमानतळासाठी बससेवा सुरू करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील विविध उपनगरांतून माफक दरात थेट विमानतळापर्यंत सार्वजनिक वाहतूक उपलब्ध झाल्यास वाहनांची संख्या कमी होऊ शकते.