
ओडिशा राज्यातून पुण्यात विक्रीसाठी नेण्यात येणाऱया 76 लाख 30 हजार रुपयांचा 152.61 किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर पकडला. नाशिककडून पुण्याच्या दिशेने जाणाऱया टाटा नेक्सॉन कारमधून गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सायखिंडी फाटा (ता. संगमनेर) येथे सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत गांजासह कार, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 88 लाख 77 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात दत्तात्रय नानाभाऊ इचके (वय 33) आणि श्रीहरी बाळू मिडगुले (वय 35, दोघे रा. कवठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच गांजापुरवठा करणारा ‘कुंफू’ (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) तसेच गांजा स्वीकारणारे साहेबराव ऊर्फ भाऊसाहेब बाबू मिडगुले (रा. कान्हूर मसाई, ता. शिरूर, जि. पुणे) आणि विशाल उर्फ दाद्या(पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) हे संशयित असून, त्यांचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी उपनिरीक्षक विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले होते. या पथकात अंमलदार विजय पवार, रिचर्ड गायकवाड, विकास साळवे, राहुल डोके, भीमराज खर्से, भगवान थोरात, सुनील मालणकर आणि महादेव भांड यांचा समावेश होता.
सोमवारी (दि. 5) पोलीस पथक संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांबाबत माहिती घेत असताना टाटा नेक्सॉन कारमधून अमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने संगमनेर शहरचे पोलीस निरीक्षक संदीप वऱहाडे यांच्या मदतीने नाशिक-पुणे महामार्गावरील सायखिंडी फाटा येथे सापळा रचला. यावेळी माहितीतील टाटा नेक्सॉन कार येताच, पोलिसांनी ती रोखून तपासणी केली असता, त्यामध्ये अमली पदार्थ आढळून आले. त्यानंतर कारमधील दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची व वाहनाची झडती घेण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी 152.61 किलो गांजा, 12 लाखांची कार, दोन मोबाईल असा एकूण 88 लाख 77 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

































































