
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये राजकीय हालचाली वाढल्या असून केंद्रीय तपास यंत्रणाही अचानक सक्रिय झाल्या आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कार्यालयावर व त्यांचे ओएसडी राजबीर सिंग घुमान यांच्या घरावर आज सीबीआयने छापे टाकले. मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंधित कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात सीबीआयने ही कारवाई केली. या छाप्यांमुळे पंजाबमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.
पंजाब सरकारमध्ये बदल्या, बढत्या आणि शस्त्र परवान्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजबीर सिंग घुमान यांचा या सगळ्याशी थेट संबंध आहे, असा आरोप करत अॅड. निखिल सराफ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेसोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या आधारे उच्च न्यायालयाने सोमवारी सीबीआयला चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर आज सायंकाळी सहा वाजता ईडीची पथके चंदीगडमध्ये धडकली. त्यांनी घुमान यांच्या चंदीगड येथील घरावर छापे टाकले. तर, भगवंत मान यांच्या कॅम्प येथील कार्यालयाचीही झडती घेतली. या छाप्यांमध्ये सीबीआयच्या हाती नेमके काय लागले हे कळू शकलेले नाही.
ही भाजपची निवडणुकीची तयारी
भगवंत मान यांनी या छाप्यांवर संताप व्यक्त केला. ‘भाजपने पंजाबच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आजचे छापे हा त्याचाच भाग आहे. आता हे प्रकार वाढत जातील. पंजाब सरकारला आणि मला बदनाम करण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर केला जाईल. आमच्या सरकारला मिळणारे प्रेम आणि पाठिंब्यामुळे भाजप बिथरला आहे,’ अशी टीका मान यांनी केली.



























































