
उत्तरकाशीतील झाला येथून सारसीकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे रुद्रप्रयाग येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टरमध्ये क्रू मेंबरसह सहा जण होते. सर्वजण सुखरुप आहेत. अगस्यमुनी येथील क्रीडांगणावर हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हिमालयन सर्व्हिसेसद्वारे चालवले जाणारे हे हेलिकॉप्टर उत्तरकाशीतील झाला येथून सारसी हेलिपॅडकडे चालले होते. यादरम्यान हवामानात अचानक बिघाड झाला. परिस्थिती लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून पायलटने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हेलिकॉप्टर अगस्यमुनी येथे उतरवण्याचा निर्णय घेतला. क्रूसह हेलिकॉप्टरमध्ये सहा जण होते. सर्वजण सुरक्षित असून कोणालाही दुखापत झालेली नाही, असे प्रशासनाने सांगितले.

























































