एअर मार्शल आशुतोष दीक्षित हवाई दलाचे नवे प्रमुख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची हिंदुस्थानी हवाई दलाचे 29 वे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आशुतोष दीक्षित हे 31 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारपासून एअर चीफ मार्शल पदाचा कार्यभार स्वीकारतील. सध्याचे हवाई दल प्रमुख, एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग त्याच दिवशी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी आशुतोष दीक्षित पदाचा कार्यभार सांभाळतील.

एअर मार्शल आशुतोष दीक्षित सध्या हवाई दलाचे उपप्रमुख या पदावर कार्यरत आहेत. 9 डिसेंबर 1966 रोजी जन्मलेल्या दीक्षित यांना 6 डिसेंबर 1986 रोजी फायटर स्ट्रीममध्ये कमिशन देण्यात आले. यापूर्वी त्यांनी चीफ ऑफ द इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ आणि सेंट्रल एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून काम पाहिले आहे. ते नॅशनल डिफेन्स अकॅडमी, डिफेन्स स्टाफ सर्व्हिस कॉलेज, बांगलादेश आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत.

दीक्षित यांना मिराज-2000, मिगची विविध विमाने, किरण, जॅग्वार, आयएल-78, हॉक आणि तेजस यांसारख्या विविध विमानांवर 3,500 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ऑपरेशन सतेद सागर, ऑपरेशन रक्षक आणि ऑपरेशन सिंदूर यांसारख्या अनेक मोहिमा आणि सरावांमध्ये सक्रिय भूमिका बजावली. त्यांनी पश्चिम क्षेत्रातील एका आघाडीच्या लढाऊ हवाई तळाचे आणि दक्षिण क्षेत्रातील एका प्रमुख लढाऊ प्रशिक्षण तळाचे नेतृत्व केले आहे.