
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी अद्याप रखडले असून, काही भागात अजूनही एकेरी वाहतूक सुरू आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी महामार्गाच्या कामाला अपेक्षित वेग आलेला नसल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महामार्ग एकेरी सुरू असल्याने संगमेश्वर तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. संगमेश्वर परिसरातील सोनवी पुलादरम्यान अद्याप एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहनांची ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहेत. पुलाच्या परिसरातील कामे पूर्ण होण्यास विलंब होत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा वेळ वाया जात असून वाहतुकीचा वेगही मंदावला आहे.
दरम्यान, सप्तलिंगी पुलाचे काम नेमके कधी पूर्ण होणार, असा सवाल वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पुलाच्या कामासह महामार्गाच्या विविध टप्प्यांवरील प्रलंबित कामे पूर्ण करण्याची मागणी सातत्याने होत आहे. महामार्गाच्या मुख्य मार्गाबरोबरच साइड रस्त्यांचा प्रश्नही अद्याप कायम आहे. महामार्गाच्या कामामुळे गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात खडी टाकून रस्ते सुरू ठेवले जात असले तरी कायमस्वरूपी व सुरक्षित जोडरस्ते कधी तयार होणार, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. महामार्गाच्या कामाला विलंब होत असल्याने स्थानिक नागरिक, पादचारी, दुचाकीस्वार तसेच सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना त्याचा फटका बसत आहे. पावसाळ्यानंतर रस्त्याच्या कामांना वेग येईल, अशी अपेक्षा असतानाही अनेक ठिकाणी कामे संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे सोनवी पुलासह सप्तलिंगी पूल आणि संगमेश्वर परिसरातील सर्व प्रलंबित कामे तातडीने सुरू करून पूर्ण करावीत, तसेच गावांना जोडणारे साइड रस्ते सुरक्षित व कायमस्वरूपी तयार करावेत, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.




























































