आदि कैलासमध्ये बर्फवृष्टीचा कहर; 14,500 फूट उंचीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमधील प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटनस्थळ आदि कैलास येथे सोमवारी अनोखे दृश्य पाहायला मिळाले. तब्बल 14,500 फूट उंचीवर बर्फाच्छादित रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. जोरदार बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर तीन ते चार फूट बर्फ साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. आदि कैलास म्हटलं की डोळ्यांसमोर येतात बर्फाने झाकलेले डोंगर, शांत रस्ते आणि निसर्गरम्य परिसर. मात्र, वाढत्या पर्यटकसंख्येमुळे आता या भागाचं चित्र बदलताना दिसत आहे. सोमवारी मोठ्या संख्येने वाहने या परिसरात दाखल झाल्याने अरुंद झालेल्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. अनेक वाहनचालकांना तासन्तास पुढे जाण्याची प्रतीक्षा करावी लागली.

2023 मध्ये 10 हजार 079 प्रवाशांनी आदि कैलासला भेट दिली होती. 2024 मध्ये हा आकडा 29 हजार 423, तर 2025 मध्ये 31 हजार 558 वर पोहोचला. विशेष म्हणजे, 2026 मध्ये आतापर्यंत सुमारे 63 हजार पर्यटक येथे दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. सीमा रस्ते संघटनेने (BRO) या भागातील रस्ते सुधारण्यासाठी काम केले आहे. अनेक ठिकाणी डांबरीकरण झाल्याने सामान्य हवामानात वाहनांची ये-जा तुलनेने सुलभ झाली आहे. मात्र, यंदाच्या जोरदार बर्फवृष्टीने वाहतुकीसमोर नवी अडचण निर्माण केली. रस्त्यावर तीन ते चार फूट बर्फ साचल्याने मार्गाची रुंदी मोठ्या प्रमाणात कमी झाली. त्यातच मोठ्या संख्येने वाहने एकाच वेळी दाखल झाल्याने वाहनांना एकमेकांना मार्ग देणेही कठीण झाले. परिणामी, काही वेळातच वाहनांची मोठी रांग लागली.

आदि कैलासमध्ये वाढणारी पर्यटकांची संख्या आता या उंच पर्वतीय भागातील व्यवस्थापनासाठी आव्हान ठरत आहे. विशेषतः बर्फवृष्टीच्या काळात रस्ते अरुंद होत असल्याने मोठ्या संख्येने वाहनांची वाहतूक नियंत्रित करणे कठीण ठरू शकते.