दिल्ली आंदोलनात महिला पत्रकाराचा छळ; ACP वर कारवाई, ‘अतिरिक्त डीसीपी’ पदाचा पदभार रोखला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी 2 ऑक्टोबरपासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी तीन महिला पत्रकारांचा विनयभंग केल्याच्या आरोपामुळे खळबळ उडाली. या घटनेनंतर पत्रकार व सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरनी संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर धरणे आंदोलन करून दोषी पोलिसावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याचपार्श्वभूमीवर संबंधित पोलिसावर कारवाई करण्यात आली आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, एसीपी विवेक भगत असे पीडित महिला पत्रकारांचा विनयभंग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. पत्रकारांच्या आरोपांनंतर एसीपी विवेक भगत यांच्या अतिरिक्त डीसीपी पदाचा कार्यभार मागे घेण्यात आला आहे. दिल्ली सरकारने एक्स (X) वर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि योग्य निकाल लागेपर्यंत आपल्याला हा कार्यभार नको आहे, अशी विनंती स्वत: विवेक भगत यांनी केली होती.

गेल्या सोमवारी (5 ऑक्टोबर) 12 अधिकाऱ्यांना अतिरिक्त डीसीपी पदाचा तात्पुरता कार्यभार देण्याचा आदेश जारी करण्यात आला होता, ज्यामध्ये भगत यांचाही समावेश होता. मात्र, तीव्र पडसाद उमटल्यानंतर सरकारकडून या निर्णयात बदल करण्यात आला आहे. आता हा आदेश बदलून उर्वरित 11 अधिकाऱ्यांच्या नावांचा नवीन आदेश जारी केला जाणार आहे.

दरम्यान, 3 ऑक्टोबर रोजी जंतरमंतरवर निवडणूक आयोगाच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी दिल्ली पोलिसांवर विनयभंगाचे आरोप केले होते. या प्रकरणाची तक्रार दिल्ली पोलिसांनी मिळवली असून पुढील चौकशीसाठी ती गुन्हे शाखेकडे (Crime Branch) सोपवण्यात आली आहे.

पोलिसांकडून महिला पत्रकारांचा विनयभंग झाल्याच्या आरोपाने खळबळ, दिल्लीत आंदोलक आक्रमक