
>> प्रांजल वाघ, [email protected]
कर्नाटक राज्यातील बेळगाव जिह्यात वसलेले यमकनमर्डी हे केवळ एक शांत गाव नसून, मराठेशाहीच्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणारे एक महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे. हिडकल धरणाच्या जवळच वसलेला, सुमारे 350 ते 400 वर्षांपूर्वी उभारलेला हा भुईकोट किल्ला तत्कालीन लष्करी आणि सामरिक रचनेचा एक उत्तम नमुना मानला जातो.
काळाच्या ओघात किल्ल्याची बाह्य तटबंदी नामशेष झाली असली तरीही इथे दिमाखात उभा असलेला ‘निशाण बुरुज’ आपले लक्ष वेधून घेतो. दख्खनी पाषाणात बांधलेला हा बुरुज केवळ एक टेहळणीचा मनोरा नसून शत्रूवर तोफेचा मारा करणारी आणि काही अर्थी अनोखी वास्तू आहे. या बुरुजाच्या आत फिरता जिना, तोफा व दारूगोळा ठेवण्यासाठी खोल्या (‘दारू कोठार‘) आणि शत्रूवर नजर ठेवण्यासाठी बारीक जंग्या बांधल्या आहेत.
मराठा साम्राज्याच्या विस्ताराच्या काळात बेळगाव आणि हुक्केरी परिसर हा सीमावर्ती प्रदेश म्हणून अत्यंत संवेदनशील होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर पेशव्यांच्या काळात या परिसराचे रक्षण करण्यासाठी यमकनमर्डीचा उपयोग एका ‘वॉचटॉवर’ आणि लष्करी छावणीसारखा केला गेला.
होनुरगड, वल्लभगड, भीमगड यांसारख्या शेजारील किल्ल्यांशी संपर्क साधण्यासाठी या बुरुजावरून धूर व आगीचे संकेत दिले जात असावेत का याचे उत्तर फक्त काळच जाणे. स्थानिक देसाई आणि सरदारांनी मराठय़ांच्या छत्रछायेखाली या भागाचा महसूल आणि रक्षण सांभाळले. पुढे 1818च्या तिसऱया इंग्रज-मराठा युद्धात ब्रिटिशांनी मराठय़ांचा पराभव केल्यानंतर अशा अनेक गढय़ांवर आपला ध्वज फडकवला, पण त्यांचे लष्करी महत्त्व कमी केले.
आजही यमकनमर्डीचा हा ऐतिहासिक बुरुज बेळगावच्या भूमीत मराठय़ांच्या धगधगत्या इतिहासाची आणि लष्करी चातुर्याची कथा सांगत खंबीरपणे उभा आहे.































































