कोल्हापुरात ज्ञानेश कुमार यांची प्रतीकात्मक तिरडी, शिवसेना आक्रमक; बिंदू चौकात आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना तत्काळ निलंबित करून तुरुंगात टाका, या मागणीसाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून ऐतिहासिक बिंदू चौकात तिरडी मोर्चा काढण्यात आला. ज्ञानेश कुमार यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये मोठी झटापट झाली. यावेळी ‘ज्ञानेश कुमार हटाव’च्या घोषणांनी वातावरण तणावपूर्ण बनले होते.

सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, या देशात घटना बदलून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह करत आहेत. ज्ञानेश कुमार यांनी घटनात्मक मतदार नोंदणीत मोठा घोळा केला आहे. कोटय़वधी मतदारांची नावे वगळली असून, ही सरळसरळ मतचोरी आहे. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू झालेली आहे. कोल्हापुरात पोलीस आंदोलकांवर दडपशाही करत आहेत. याचा आम्ही निषेध करत असून, ज्ञानेश कुमार यांना निलंबित केल्याशिवाय हे जनआंदोलन थांबणार नाही, असा इशाराही देवणे यांनी दिला.

यावेळी जिल्हाप्रमुख विराज पाटील, मंजीत माने, विशाल देवकुळे, राजू यादव, अवधुत साळोखे, पोपट दांगट, सतीश पानारी, दीपक गौड, हर्षल पाटील आदी शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.