
हिंदू तरुणांनी लवकर लग्न करून पाच-पाच मुले जन्माला घालावीत, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मध्य प्रदेशमधील खरगोन-बडवानी लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजेंद्रसिंह पटेल यांनी केले आहे. विविध समुदायांमधील जन्मदरातील बदलांचा दाखला देत त्यांनी हिंदू समाजातील तरुणांनी कुटुंबवाढीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली. मध्य प्रदेशातील बडवानी येथे शुक्रवारी रात्री एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान केले.
एका समुदायाचा जन्मदर 1.9 टक्के, तर दुसऱ्या समुदायाचा जन्मदर 2.9 टक्के आहे. 1947 ते 1967 या काळातील परिस्थिती आणि सध्याची परिस्थिती वेगळी असल्याचे सांगत त्यांनी स्वातंत्र्यानंतर तसेच 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार एका समुदायाच्या लोकसंख्येचे प्रमाण घटल्याचा, तर दुसऱ्या समुदायाचे प्रमाण वाढल्याचा दावा पटेल यांनी केला.
पूर्वीच्या पिढ्यांमध्ये चार, पाच, सहा किंवा सात मुले असलेली कुटुंबे सामान्य होती. त्या काळात तरुण-तरुणींची लग्ने साधारणतः वयाच्या 20 ते 22 वर्षांदरम्यान होत असत. मात्र, सध्याच्या काळात लग्नाचे वय 30 ते 37 वर्षांपर्यंत पुढे गेले असून अनेक कुटुंबांमध्ये केवळ एकच मूल जन्माला घातले जाते, असे पटेल म्हणाले. हिंदू तरुणांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लवकर विवाह करावेत आणि पाच मुले जन्माला घालावीत, असे आवाहनही त्यांनी केले.


























































