
हिंदुस्थानच्या अमन सेहरावतने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 57 किलो फ्री–स्टाइल कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. अंतिम सामन्यात अमनने उत्तर कोरियाचा विद्यमान विश्वविजेता हान चोंग साँग याला 11-7 ने पराभूत केले. पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाइल प्रकारात हिंदुस्थानचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे पहिले सुवर्णपदक आहे.
आघाडी गमावली, तरीही हार मानली नाही
अमनने अंतिम सामन्याची सुरुवात शानदार केली आणि सामन्याच्या उत्तरार्धात 6-1 अशी आघाडी घेतली. पण विश्वविजेत्याने जोरदार पुनरागमन करत 7-6 अशी आघाडी घेतली. सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये अमनने संयम राखत दोन गुण आणि नंतर रोल करून आणखी दोन गुण मिळवले. त्यानंतर अमनने 11-7 अशी आघाडी मिळाली आणि शेवटच्या 30 सेपंदात उत्कृष्ट बचाव करत सुवर्णपदक जिंकले. अमनच्या सुवर्णपदकामुळे हिंदुस्थानने आता 1978 नंतर प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली आहेत.
पंघालचे रौप्यवर समाधान
नागोया ः महिलांच्या 53 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात हिंदुस्थानच्या अंतिम पंघालला अंतिम सामन्यात जपानच्या मो कियोकाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पूर्ण वेळेत सामना 1-9 अशा मोठय़ा फरकाने संपला.
गोल्फमध्ये सांघिक रौप्यपदक
महिलांच्या सांघिक स्पर्धेत हिंदुस्थानी संघात प्रणवी उर्स, अदिती अशोक आणि दीक्षा डागर यांचा समावेश होता. चारही फेऱयांनंतर हिंदुस्थानचा एकूण स्कोर 546 होता. चीनने 538 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. हिंदुस्थानने 546 गुणांसह दुसरे स्थान पटकावले.
कुस्तीमध्ये दीपकला कांस्य
नागोया ः कुस्तीत दीपक पूनियाने शनिवारी कांस्यपदकाला गवसणी घातली. 97 किलो वजनी गटात झालेल्या अटीतटीच्या लढतीत दीपकने मंगोलियाच्या गनखुयाग गनबातार याच्यावर 2-1 अशी मात करत हे पदक आपल्या नावावर केले.
नीरजचा ऐतिहासिक कांस्यवेध
नागोया ः हिंदुस्थानचा तिरंदाज नीरज चौहानने शनिवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात कांस्यपदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली.
































































