
>> पराग खोत
मराठी रंगभूमीवर सध्या पडदा उघडतोय तो केवळ नाटकासाठी नाही, तर बदलत्या प्रेक्षकाच्या बदलत्या आवडींची चाहूल देण्यासाठी. काही वर्षांपूर्वी ‘नाटकाचा व्यवसाय कठीण झाला’ अशी चर्चा रंगत होती; आज नव्या नाटकांची लगबग, जुन्या गाजलेल्या नाटकाचे पुनरुज्जीवन, वाढती प्रयोगसंख्या आणि तिकीट खिडकीवरची गर्दी दिसते. 2025-26 मध्ये मराठी नाटकांच्या तिकीट विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत 50 टक्के वाढ झाल्याचे ‘बुकमायशो’च्या आकडेवारीचा हवाला देत वृत्त प्रसिद्ध झाले. रंगभूमी पुन्हा प्रेक्षकाला बोलावते आहे, एवढे मात्र नक्की.
या बदलाच्या केंद्रस्थानी प्रशांत दामले आणि भरत जाधव यांच्यासारखी ‘हुकमी’ नावे तर आहेतच, पण सचिन खेडेकर, महेश मांजरेकर यांचे दमदार पुनरागमनही आहे. प्रेक्षक नावांवर नाटक निवडतो, हा व्यावसायिक रंगभूमीचा जुना नियम अजून संपलेला नाही. पण फक्त स्टारडमवर आता रंगभूमी टिकत नाही. कलाकाराचे नाव दार उघडते, आत प्रेक्षकाला बसवून ठेवते ती संहिता, अभिनय आणि अनुभव.
म्हणूनच नव्या लेखकांची चाहूल महत्त्वाची आहे. डॉ. सत्यजित खारकर यांचे ‘सांगा, कसं जगायचं?’ यासारखे विषय समकालीन संघर्ष, नातेसंबंध आणि सामाजिक वास्तवाला नाटय़रूप देतात. तर संदीप दंडवते, विराजस कुलकर्णी, क्षितीज पटवर्धन, डॉ. श्वेता पेंडसे, देबू बर्वे ही मंडळी नवी भाषा, नवे विषय आणि आजच्या पिढीच्या संवेदना रंगमंचावर आणत आहेत. संकर्षण कऱहाडे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून अनेक जबाबदाऱया समर्थपणे सांभाळत आहेत. डॉ. विवेक बेळे यांच्यासारख्या तुलनेने नव्या नाटककारांच्या नाटकांचे पुनरुज्जीवनही होत आहे. म्हणजे आजचा रंगकर्मी एका चौकटीत अडकलेला नाही; तो नवे प्रयोग करतोय आणि प्रेक्षक ते स्वीकारतोय.
विनोद रत्ना, मयूर सरकाळे, मंगेश सातपुते यांच्यासारख्या तरुण रंगकर्मींकडे पाहिले की एक गोष्ट स्पष्ट होते. नव्या पिढीला रंगभूमी ‘करायची’ आहे, केवळ पाहायची नाही. विनोद रत्ना आणि त्यांच्या समूहाने एकांकिका स्पर्धांमधून लक्ष वेधले आणि ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ व्यावसायिक रंगभूमीवर आले. 2026 मध्ये या नाटकाचे शंभर प्रयोग पूर्ण झाले. स्पर्धेपासून व्यावसायिक रंगभूमीपर्यंतचा हा पूल म्हणजे मराठी रंगभूमीची खरी ताकद.
राज्यस्तरीय आणि महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आता केवळ पारितोषिकांची शर्यत राहिलेल्या नाहीत. त्या नव्या लेखकांची, दिग्दर्शकांची, अभिनेत्यांची आणि तंत्रज्ञांची प्रयोगशाळा बनल्या आहेत. विविध एकांकिका स्पर्धा आणि ‘नाटय़ परिषद करंडक’सारख्या उपक्रमांतून व्यावसायिक रंगभूमीकडे जाणाऱया कलावंतांना व्यासपीठ मिळते. म्हणजे पुढची पिढी रंगमंचाच्या मागच्या दारातून नव्हे, तर स्पर्धांच्या प्रकाशझोतातून येते आहे.
विषयांचे क्षितिजही विस्तारले आहे. काwटुंबिक नाती, स्त्राrजीवन, पिढय़ांतील संघर्ष, डिजिटल जग, सामाजिक प्रश्न, इतिहास, संगीत, विनोद आणि मानवी मनातील गुंतागुंत रंगमंचावर येते आहे. ‘संगीत देवबाभळी’, ‘चारचौघी’सारख्या निर्मिती वेगळ्या आशयाची आणि पुनरुज्जीवनाची ताकद दाखवतात. विनोदी नाटकांची मागणीही कायम आहे. प्रेक्षकाला विचार करायला लावणारे नाटक हवेच; पण दोन तास मनमुराद हसवणारे नाटकही हवे आहे.
इथे ‘हमखास चालणारे नाटक’ आणि ‘चांगले नाटक’ यातील फरक लक्षात घ्यावा लागतो. उत्तम लेखन, समर्थ अभिनय आणि कल्पक दिग्दर्शन असूनही काही प्रयोग तिकीट खिडकीवर अपयशी ठरतात. कलाकारांच्या तारखा, तिकीट दर, नाटय़गृह, प्रयोगाची वेळ, शहर, प्रसिद्धी आणि प्रेक्षकांची मानसिकता यांचे गणितही महत्त्वाचे असते. लोकप्रिय विनोद, ओळखीचे चेहरे आणि सोपी मांडणी जुळली की प्रयोग धावतात. त्यामुळे ‘फ्लॉप’ हे कलात्मक गुणवत्तेचे निकालपत्र समजणे धोकादायक आहे.
या नव्या उमेदीत ज्येष्ठांचा अनुभव आणि तरुणांची बेधडक ऊर्जा एकत्र येणे ही मोठी जमेची बाजू आहे. प्रशांत दामले यांचे व्यावसायिक भान, भरत जाधव यांची प्रेक्षकांशी घट्ट नाळ आणि संकर्षण कऱहाडे, विनोद रत्ना, मयूर सरकाळे, मंगेश सातपुते यांसारख्या पिढीची धडपड रंगभूमीचा पट रुंदावत आहे. नाटककाराला प्रेक्षकाची नाडी समजावी लागते, दिग्दर्शकाला रंगमंचाचे व्याकरण मोडण्याची हिंमत दाखवावी लागते आणि अभिनेत्याला व्यक्तिरेखा मोठी करण्याचे काwशल्य दाखवावे लागते. हे जमले की नाटक ‘प्रयोग’ राहत नाही; ते घटना बनते. आणि घटना बनली की प्रेक्षक स्वतःहून तिकीट काढतो.
तरुण प्रेक्षकाला नाटकाकडे आणण्यासाठी सोशल मीडिया हा नवा रंगमंच झाला आहे. तालमींचे क्षण, संवादांचे तुकडे, कलाकारांचे व्हिडीओ आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया थेट मोबाईलवर पोहोचतात. नाटकाची जाहिरात आता पोस्टरपुरती राहिलेली नाही; ती स्क्रीनवर जगते आहे.
व्यावसायिक रंगभूमीसमोर वाढता खर्च, नाटय़गृहांची उपलब्धता, कलाकारांच्या तारखा आणि मनोरंजनाच्या असंख्य पर्यायांचे आव्हान आहे. तरीही प्रायोगिकतेतून व्यावसायिकतेकडे कलाकार येत आहेत, व्यावसायिक रंगभूमी नवे विषय स्वीकारते आहे आणि प्रेक्षकही नवे चेहरे आजमावतो आहे.
म्हणून आजची खरी कहाणी ‘नाटक चालते की नाही’ एवढी नाही. प्रश्न आहे-नवे काय जन्माला येते, कोण ते घडवते आणि प्रेक्षक त्याला किती मनापासून कवटाळतो? तिकीट खिडकीवरचा पैसा नाटकाला पुढचा प्रयोग देतो; पण प्रेक्षकाच्या मनात निर्माण झालेला संवाद नाटकाला पुढचे आयुष्य देतो. व्यवसायाची शिस्त आणि कलेचे धाडस यांचा मेळ जमला, तर ‘हाऊसफुल्ल’चा फलक केवळ नाटय़गृहाबाहेर लागणार नाही; तो मराठी रंगभूमीच्या भवितव्यावरही लागेल. पडदा उघडलाय; आता प्रयोग दमदार हवा, हा इशारा नाटय़ रसिकच देतायत!




























































