
‘युनेस्को’च्या जागतिक वारसा तात्पुरत्या यादीत हिंदुस्थानातील पाच नव्या स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मध्य प्रदेशातील उदयगिरी लेणी, बाघ लेणी चित्रकला, चंबळ खोऱयातील मंदिर समूह आणि गिन्नौरगड यांचा समावेश आहे. तर पाचवे स्थळ हे हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेशी संबंधित ‘सत्याग्रह स्थळे’ याचा समावेश करण्यात आला आहे.
संस्पृती मंत्रालयाने ‘एक्स’वर यासंबंधी पोस्ट शेअर केली असून देशाच्या वारशासाठी अभिमानाचा टप्पा असे लिहिले आहे. या पाच नवीन स्थळांचा समावेश झाल्यानंतर हिंदुस्थानच्या ‘युनेस्को’च्या तात्पुरत्या यादीत आता 78 स्थळे झाली आहेत. एखाद्या स्थळाचा प्रथम ‘युनेस्को’च्या तात्पुरत्या यादीत समावेश केला जातो. त्यानंतरच त्याला पुढे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यासाठी विचार केला जाऊ शकतो.
उदयगिरी लेणी ही मध्य प्रदेशातील उदयगिरीच्या टेकडय़ांमध्ये खडक कापून तयार केलेले हे धार्मिक संपुल आहे. येथे 20 गुहा, मूर्ती, शिलालेख आणि इतर ऐतिहासिक वास्तू आहेत. बाघ गुहा चित्रकला ही बाघनी नदीच्या काठावर विंध्य पर्वताच्या दक्षिण उतारावर नऊ बौद्ध लेणी आहेत. येथील लेण्यांमध्ये असलेली भित्तिचित्रे विशेष महत्त्वाची आहेत. गिन्नौरगड मध्य भारतातील जुन्या राज गोंड शासकांची प्रमुख किल्लेबंद राजधानी होती. चंबळ खोऱयातील मंदिर समूह ही मंदिरे प्रामुख्याने आठव्या ते 11 व्या शतकादरम्यान बांधली गेली असून मध्य भारतातील नागर शैलीतील मंदिर वास्तुकलेचा विकास दर्शवतात. ‘सत्याग्रहाची स्थळे’ ही आणि दक्षिण आफ्रिकेची संयुक्त मालिकात्मक आंतरराष्ट्रीय वारसा मालमत्ता आहे.


























































