
सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या भ्रष्ट निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीने आज जबरदस्त रणशिंग फुंकले. मतचोरी आणि ‘एसआयआर’ घोटाळ्यास जबाबदार असलेल्या ज्ञानेश कुमारांना मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून हाकला आणि लोकशाही वाचवा, असा नारा देत इंडिया आघाडीने देशात आंदोलनांचा धडाका लावण्याची घोषणा केली. शुक्रवार 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिनी या देशव्यापी आंदोलनाला सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने, पदयात्रा, निवडणूक कार्यालयावर मोर्चा आणि विराट सभा घेऊन संपूर्ण देशातील वातावरण ढवळून काढले जाणार आहे.
निवडणूक आयोगातील बंडाळीनंतर ज्ञानेश कुमार यांचा भ्रष्ट कारभार चव्हाटय़ावर आला आहे. निवडणूक घोटाळ्यांवर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट आहे. ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील कॉन्स्टिटय़ुशन क्लबमध्ये बुधवारी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, राजदचे तेजस्वी यादव, कपिल सिब्बल आदी नेते उपस्थित होते.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीची माहिती दिली. बैठकीत सर्व नेत्यांनी आपले म्हणणे मांडले. काही नेत्यांनी ऑनलाइन सहभाग घेतला. सर्व विरोधी पक्ष लोकशाहीची ही लढाई लढण्यासाठी एकजूट झाले असून ताकदीने लढणार आहेत, असे खरगे म्हणाले. मोदी-शहा निवडणूक आयोगाला बाहुल्यासारखे नाचवत आहेत. त्याविरोधात आम्ही आवाज उठवणार, असे खरगे म्हणाले.
राष्ट्रपतींची भेट घेणार!
मोर्चा आणि जाहीर सभांचा धुरळा उडवतानाच इंडिया आघाडीचे नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. त्यासाठी त्यांची वेळ घेतली जाणार आहे. निवडणुकीतील घोटाळे आणि मतचोरीची माहिती
सुप्रीम कोर्टाला आवाहन
सर्वोच्च न्यायालयापुढे एसआयआर आणि निवडणुकीशी संबंधित अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. ही सर्व प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढावीत, असे आवाहन इंडिया आघाडीने बैठकीच्या निमित्ताने करण्यात आले आहे.

























































