
इंडिया आघाडीच्या बैठकीत निवडणुकांतील घोटाळ्यांवर प्रदीर्घ चर्चा झाली व चर्चेअंती आंदोलनाची रणनीती ठरविण्यात आली. त्यानुसार, शुक्रवार 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर निदर्शने करण्यात येणार आहेत. या माध्यमातून लोकांना जागृत केले जाणार आहे. त्याच दरम्यान 6 ऑक्टोबर रोजी विरोधी पक्षाचे सर्व खासदार निवडणूक आयोगावर धडक मोर्चा काढणार आहेत. इंडिया आघाडीच्या पाच विराट जाहीर सभा होणार आहेत. या सभांची ठिकाणे आणि तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. तर 1 नोव्हेंबरला दिल्लीत महामोर्चा काढला जाणार आहे.
देशाची लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्यांना शिक्षा होणारच. मग तो कोणीही असो आणि कितीही मोठा असो. काही फरक पडत नाही. हिंदुस्थानची लोकशाही कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा मोठी आहे. देशात जे सुरू आहे ते चुकीचे आहे. ते थांबवायला पाहिजे, अशी सर्वांचीच भावना आहे. तरुण वर्गही संघर्षाला तयार झाला आहे. त्यामुळे पुढच्या काही महिन्यांत देशात मोठा बदल घडेल. – राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते

























































