
हिंदुस्थानी तिरंदाजांसाठी आशियाई क्रीडा स्पर्धेत बुधवारचा दिवस सोनेरी यशाचा ठरला. कंपाऊंड तिरंदाजीतील पुरुष, महिला आणि मिश्र सांघिक अशा तिन्ही प्रकारांत हिंदुस्थानने सुवर्णपदक पटकावून तिरंदाजीमध्ये सुवर्ण हॅट्ट्रिक साधली. पुरुषांच्या अंतिम सामन्यात साहिल राजेश, कुशल दलाल आणि मणिरत्नम गणेश थिरूमुरू या युवा त्रिकुटाने चीनला 238-237 असे अवघ्या एका गुणाने लोळवत हिंदुस्थानच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा केले. त्यामुळे हिंदुस्थानने आजपर्यंत एकूण 60 पदकांची कमाई केली.
पिछाडीवरून बाजी पलटवली
चीनविरुद्धच्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानी संघाची सुरुवात काहीशी पिछाडीची होती. 18 बाणांच्या तीन फेऱ्यांनंतर चीनने 179, तर हिंदुस्थानने 178 गुण मिळवले होते. त्यामुळे हिंदुस्थानी तिरंदाजांवर दबाव वाढला होता. मात्र, निर्णायक सहा बाणांमध्ये हिंदुस्थानी तिरंदाजांनी कमालीचा संयम आणि अचूकता दाखवत सामन्याचे चित्रच पालटले. चीनच्या एका तिरंदाजाचा एक बाण आठ गुणांवर गेल्याचा फायदा हिंदुस्थानला मिळाला. हिंदुस्थानी त्रिकुटाने संधीचे सोने करत आघाडी घेतली आणि अखेर 238-237 असा थरारक विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले.
युवा त्रिकुटाचा जबरदस्त वार
21 वर्षीय कुशल दलाल, 25 वर्षीय साहिल राजेश आणि 20 वर्षीय मणिरत्नम गणेश यांनी दबावाच्या परिस्थितीतही संयम सोडला नाही. अखेरच्या फेरीत अचूक निशाणा साधत त्यांनी चीनच्या आव्हानाला चीतपट केले. याआधी चिकिता तनीपर्थी, पृथिका प्रदीप आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांच्या महिला कंपाऊंड संघाने चीनला पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर चिकिता तनीपर्थी आणि साहिल जाधव यांच्या मिश्र सांघिक जोडीने दक्षिण कोरियाचा पराभव करून हिंदुस्थानला दुसरे सुवर्ण मिळवून दिले. पुरुष संघाच्या विजयाने कंपाऊंड तिरंदाजीतील हिंदुस्थानची सुवर्ण हॅट्ट्रिक पूर्ण झाली.
साहिल–चिकिता जोडीची शूटऑफमध्ये बाजी
अवघ्या दोन तासांच्या अंतराने हिंदुस्थानी कंपाउंड तीरंदाजांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली. प्रथम ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिता तनीपर्थी यांच्या महिला संघाने चीनला 238-234 असे पराभूत करत सुवर्णपदकावर नाव कोरले. त्यानंतर चिकिता आणि साहिल जाधव या जोडीने दक्षिण कोरियाला थरारक शूटऑफमध्ये 20-19 असे नमवत दुसरे सुवर्ण मिळवले.
157-157 ची बरोबरी; शूटऑफमध्ये थरारक जय
हिंदुस्थान आणि दक्षिण कोरियामधील मिश्र कंपाउंड अंतिम सामना सुरुवातीपासूनच चुरशीचा ठरला. चार फेऱ्यातील 16 बाणांनंतर दोन्ही संघांचे गुण 157-157 असे समान होते. निर्णायक फेरीत कोरियाने 40 गुण मिळवले, तर हिंदुस्थानला 39 गुण मिळाल्याने सामना शूटऑफमध्ये गेला. शूटऑफमध्ये चिकिता तनीपर्थीने पहिलाच बाण 10 गुणांवर मारत दबाव वाढवला. कोरियाच्या महिला तीरंदाजानेही 10 गुण मिळवले. त्यानंतर साहिल राजेश जाधवनेही परफेक्ट 10 साधला. आता सुवर्णासाठी कोरियाला 10 गुणांची गरज होती; मात्र त्यांच्या पुरुष तीरंदाजाचा बाण 9 गुणांवर अडकला. भारताने 20-19 असा विजय मिळवत सुवर्णावर शिक्कामोर्तब केले.
सुवर्णासोबत थेट ऑलिम्पिकची वाट
एशियन गेम्समधील या विजयामुळे साहिल आणि चिकिता यांना 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्रता कोटा मिळाला. कंपाउंड तीरंदाजी आणि मिश्र सांघिक प्रकाराचा ऑलिम्पिक कार्यक्रमात नव्याने समावेश झाला आहे. एशियन गेम्समधील विजेत्या संघांना ऑलिम्पिकसाठी एक पुरुष आणि एक महिला कोटा स्थान मिळणार आहे.
महिला संघाचा विश्वविक्रमासह बलाढय़ चीनला दणका

बुधवारच्या दिवसाची सुरुवातही हिंदुस्थानने सुवर्ण पदकानेच केली. चिकिता तनीपर्थी, पृथिका प्रदीप आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांच्या महिला कंपाउंड संघाने चीनचा 238-234 असा पराभव केला. हिंदुस्थानचे 238 गुण हा नवा विक्रम ठरला. सुरुवातीच्या फेरीत हिंदुस्थानने 30-28 अशी आघाडी घेतली. त्यानंतर पृथिका आणि ज्योती यांनी सातत्याने अचूक 10
गुणांची निशाणे साधत आघाडी कायम ठेवली. तिसऱ्या फेरीनंतर हिंदुस्थानने 178-175 अशी आघाडी घेतली होती. अखेरच्या फेरीत चीनने दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला; मात्र हिंदुस्थानी तिकडीने शेवटचे सर्व बाण 10 गुणांवर साधत विश्वविक्रमासह सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.

























































