
बिहारमधील एका उच्चपदस्थ अधिकारी दाम्पत्याच्या घरावर आणि कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या छाप्यात कोट्यवधींचे बेहिशोबी घबाड उघडकीस आले आहे. या कारवाईत तब्बल १ कोटींहून अधिक रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, महागडी घड्याळे आणि मोठ्या प्रमाणावर मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
पाटण्याचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी रवींद्र कुमार दिवाकर आणि त्यांच्या पत्नी दानापूरच्या जिल्हा उपनिबंधक कुमारी स्वीटी यांच्याविरोधात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याप्रकरणी ही धडक कारवाई करण्यात आली.
पाटणा आणि बेगुसरायमध्ये एकाच वेळी छापे
बिहार दक्षता विभागाच्या पथकांनी सोमवारी दिवाकर यांच्या पाटणा येथील निवासस्थानासह बेगुसरायमधील त्यांच्या मूळ गावी एकाच वेळी छापे टाकले. दक्षता विभागाच्या पोलीस उपमहानिरीक्षकांच्या थेट देखरेखीखाली ही संपूर्ण कारवाई पार पडली. घरातून जप्त करण्यात आलेली रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना नोटा मोजण्याची मशिन आणावी लागली होती.
आतापर्यंत काय-काय जप्त झाले?
पाटणा निवासस्थान: ७० लाख रुपयांची रोकड आणि ६ लाख रुपये किमतीची ४८ महागडी ब्रँडेड घड्याळे.
बेगुसराय येथील घर: ९ लाख रुपयांची रोख रक्कम आणि कोट्यवधींचे सोन्या-चांदीचे दागिने.
इतर पुरावे: दोन्ही ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणावर जमिनींची कागदपत्रे, बँक खाती, गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत.
























































