बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत जाणाऱ्या गुजरातमधील तिघांचे इथिओपियात अपहरण; सुटकेसाठी मागितली १ कोटींची खंडणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेत जाऊन उज्वल भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या गुजरातमधील एका कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. ‘डंकी रूट’ म्हणजेच बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुजरातमधील एकाच कुटुंबातील तीन तरुणांचे आफ्रिकेतील इथिओपिया देशात अपहरण करण्यात आले आहे. या तिघांच्या सुरक्षित सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी तब्बल १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली असून, या घटनेने कुटुंबीयांचे धाबे दणाणले आहेत. ऋत्विक जनसारी (रा. वडस्मा, मेहसाणा), ममता चावडा (रा. गोजरिया) आणि मयुरी (रा. गांधीनगर) अशी अपहरण झालेल्या तिघांची नावे आहेत.

व्हिसा न मिळाल्याने बेकायदेशीर मार्गाची निवड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला वारंवार प्रयत्न करूनही अमेरिकेचा कायदेशीर व्हिसा मिळत नसल्याने गोजरिया येथील किरीटभाई चौहान यांनी स्थानिक एजंटशी संपर्क साधला होता. एजंटने त्यांना बेकायदेशीर मार्गाने तिघांनाही अमेरिकेत पोहोचवण्याचे आमिष दाखवले. यासाठी प्रतिव्यक्ती ६० ते ७५ लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार कुटुंबीयांनी कडी तालुक्यातील डांगरवा येथील स्थानिक एजंट अल्पेश पांचाळ याला टप्प्याटप्प्याने पैसे दिले.

कॅनडाच्या नावाखाली इथिओपियात डांबले

हे तिघे २० सप्टेंबर रोजी घरातून निघाले होते. गुजरातहून राजस्थान, जयपूरमार्गे त्यांना विमानाने आधी अबुधाबी आणि तेथून इथिओपियाची राजधानी आदिस अबाबा येथे नेण्यात आले. तिकडे ते स्वाझीलँड स्ट्रीटवरील एका शिबिरासारख्या ठिकाणी थांबले होते. कुटुंबीयांना अंधारात ठेवत तिघेही कॅनडात पोहोचल्याचे सांगण्यात आले. २२ सप्टेंबर रोजी ममताने आपल्या वडिलांना फोन करून कॅनडात पोहोचल्याचे सांगितले, मात्र त्यानंतर या तिघांशीही कुटुंबीयांचा संपर्क पूर्णपणे तुटला.

‘खान’ नावाच्या व्यक्तीचा १ कोटींच्या खंडणीसाठी फोन

संपर्क तुटल्यानंतर २४ सप्टेंबर रोजी कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, स्वतःची ओळख ‘खान’ अशी सांगणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने कुटुंबीयांना फोन करून तिघांचे अपहरण झाल्याचे सांगितले आणि त्यांच्या सुटकेसाठी १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. अपहरण झाल्यानंतर यापूर्वीच ६० लाख रुपये अपहरणकर्त्यांना देण्यात आले होते, तरीही ते आता आणखी १ कोटी रुपयांची मागणी करत आहेत. पुढील प्रवासाची जबाबदारी असलेल्या एजंटशी सध्या कोणताही संपर्क होत नसल्याचेही त्याने सांगितले.

मुलांना सुखरूप परत आणण्यासाठी सरकारकडे साकडे

“आम्ही आमच्या मुलांना अमेरिकेत पाठवण्यासाठी एजंटला लाखो रुपये दिले. आता आमची मुले संकटात सापडली असून सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करावा आणि तिघांनाही सुखरूप भारतात परत आणावे,” अशी आर्त हाक या तरुणांच्या पालकांनी दिली आहे.

या प्रकरणी पोलीस आता बेकायदेशीर मानवी तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा कसून तपास करत आहेत. या प्रवासात आणखी कोणकोणते एजंट सहभागी होते आणि अपहरणामागे नेमके कोणाचे नेटवर्क कार्यरत आहे, याचा शोध घेतला जात आहे