
नवी दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक झाली. ही बैठक जवळपास साडेतीन तास चालली. या बैठकीत २० राजकीय पक्ष सहभागी झाले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेने बैठकीला ऑनलाइन उपस्थित होते. बैठकीनंतर आघाडीच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माध्यमांना माहिती दिली. सर्वच पक्षांनी निवडणूक आयोगाविरोधात एकजुटीने आणि मजबुतीने मिळून लढाई लढण्याची भूमिका मांडली, असे खरगे यांनी सांगितले.
निवडणूक आयोग बाहुलं बनलं आहे. या विरोधात २० विरोधी पक्ष मिळून २ ऑक्टोबरपासून ते ८ ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात ‘लोकशाही वाचवा मार्च’ काढतील, असे खरगे म्हणाले. आम्ही साडेतीन तास चर्चा केली. राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि अनेकजणांनी सूचना केल्या. मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधाचे वातावरण आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी निवडणूक आयोगाचं बाहुलं बनवून खेळ खेळत आहेत, असा हल्ला खरगे यांनी चढवला.
‘मार्च टू इलेक्शन कमिशन’
२-८ ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात लोकशाही वाचवा मार्च काढण्यात येईल. जिल्हा दंडाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल आणि आंदोलन का केले जात आहे? याची माहिती जनतेला दिली जाईल. तसेच ६ ऑक्टोबरला विरोधी पक्षांचे सर्व खासदार ‘मार्च टू इलेक्शन कमिशन’ म्हणजे निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती खरगे यांनी दिली.
राष्ट्रपतींची भेट घेणार
विरोधी पक्षांचे नेते ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रपतींकडे भेटीची वेळ मागतील. या भेटीत राष्ट्रपतींसमोर समस्या आणि सरकार ज्या घटनात्मक अडचणी निर्माण करत आहे, ज्यामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे, उद्धवस्त केले जात आहे आणि त्यांचे खोटे सरकार चलवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आम्ही राष्ट्रपतींसमोर मांडू. यानंतर आमची मोठी रॅली होली. त्याची तारीख आणि स्थान निश्चित झाल्यात माहिती दिली जाईल. ही रॅली ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होईल. १ नोव्हेंबरला दिल्लीत एक मोठी रॅली होईल. या माध्यमातून जनतेचे लक्ष केंद्रीत करण्याचा आमचा प्रयत्न असेल. या रॅलीत ‘मतचोरी’शी संबंधित मुद्दे उचलले जातील. तसेच SIR शी संबंधित सर्व प्रकरणांचा सर्वोच्च न्यायालयात लवकरात लवकर निकाल लावावा, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.























































