
पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून नागरिकांमध्ये अंधश्रद्धा निर्माण करत, त्यांचा विश्वास संपादन करून पैसे उकळायचे आणि बनावट नोटांचा वापर करून फसवणूक करण्याच्या प्रकाराचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. अहिल्यानगर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत पुणे जिल्ह्यातील बारामती येथील तिघांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून पाचशे रुपयांच्या एकूण 1 कोटी 3 लाख 74 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गणेश दिलीप शेवाळे (वय 33, रा. अशोकनगर, बारामती), सुमित विकास चंदनशिवे (वय 25, रा. तांदुळवाडी, बारामती) आणि सूरज वसंत कांबळे (वय 27, रा. झारगडवाडी, बारामती) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
स्थानिक गुन्हे शाखेला मंगळवारी (दि. 29) एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश शेवाळे बनावट नोटा बाळगून त्याचा व्यवहारात वापर करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष त्याच्या घरावर धाड टाकली. घरातील जिन्याखाली ठेवलेल्या पिशवीची झडती घेतली असता बनावट नोटांचा मोठा साठा आणि बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे कोऱया कागदांचे बंडल हाती लागले.
पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता या प्रकरणाचे धागेदोरे अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर व्यक्तींपर्यंत पोहोचल्याचे समोर आले. गणेश शेवाळे याने दिलेल्या माहितीनुसार, प्रताप धुमाळ (रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर) आणि अशोक भीमराज दारकुंडे (रा. गजानन कॉलनी, अहिल्यानगर) हे दोघे फरार आहेत. तसेच अम्मू (रा. मालेगाव, जि. नाशिक) याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या फरार संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. आरोपींनी केवळ बनावट नोटांचा व्यवहार करण्यापुरते हे रॅकेट मर्यादित ठेवले नव्हते. ‘पैशांचा पाऊस पाडतो’, असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करत त्यांच्याकडून पैसे घेऊन फसवणूक करण्याचा प्रकार केल्याचे चौकशीत समोर आले आहे. यासाठी बनावट नोटांचा वापर केला जात असल्याची माहितीही आरोपींनी पोलिसांना दिली.
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संदीप दरवडे, विजय ठोंबरे, गणेश लोंढे, शाहीद शेख, संदीप पवार, विष्णू भागवत, सुयोग सुपेकर, संतोष खैरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.



























































