
मुंबई महापालिकेच्या विधी खात्याच्या कारभारावर आज महासभेत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. विधी खात्याच्या कामकाजाच्या आलेल्या तक्रारींची तातडीने चौकशी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेनेने केली.
यासंदर्भात महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. विधी खात्यातील काही अधिकारी व कर्मचाऱयांनी कथित छळवणूक, जाचक कार्यपद्धती, अतिरिक्त प्रशासकीय कार्यभार तसेच कार्यालयीन समन्वयाच्या अभावाबाबत लेखी तक्रारी केल्याचे किशोरी पेडणेकर यांनी नमूद केले.
प्राप्त तक्रारीनुसार, विधी खात्यातील अधिकारी व कर्मचारी वर्गावर कथितपणे होत असलेल्या छळवणुकीचा परिणाम त्यांच्या दैनंदिन कामकाजावर होत आहे. न्यायालयीन कामकाजासोबतच अधिकारी व कर्मचाऱयांवर अतिरिक्त प्रशासकीय कामकाजाचा भार टाकला जात असल्याच्या तक्रारीत नमूद आहे. संयुक्त कायदा अधिकारी, उप कायदा अधिकारी, सहाय्यक कायदा अधिकारी आणि इतर कर्मचाऱयांच्या कामकाजाबाबत वरिष्ठ पातळीवरून योग्य संवाद व समन्वयाचा अभाव असल्याची तक्रार आहे. संबंधित अधिकारी-कर्मचाऱयांशी पुरेशी चर्चा न करता बदल्या करण्यात येत असल्याने कामकाजात व्यत्यय निर्माण होत असल्याचेही पेडणेकर यांनी म्हटले.
महापालिका प्रशासनाने विधी खात्याच्या एकूण कारभाराचा सखोल आढावा घेऊन अधिकारी-कर्मचाऱयांच्या तक्रारींची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.


























































