खोणी, शिरढोण येथील घरांच्या सेवाशुल्कात कपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रहिवाशांच्या मागणीनंतर म्हाडाच्या कोकण मंडळाने खोणी आणि शिरढोण येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या सेवाशुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे खोणी येथील लाभार्थ्यांना दरमहा 622 रुपये, तर शिरढोण येथील लाभार्थ्यांना दरमहा 279 रुपये इतका आर्थिक दिलासा मिळणार आहे. सुधारित सेवाशुल्क 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी खोणी आणि शिरढोण येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रकल्पांची स्थळ पाहणी केली होती. यावेळी योजनेतील लाभार्थ्यांनी घरांसाठी आकारण्यात येणारे सेवाशुल्क कमी करण्याची विनंती केली होती. लाभार्थ्यांच्या या मागणीची दखल घेत जयस्वाल यांनी सेवाशुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.