हिंदुस्थानच्या वाघिणींची सुवर्णधाव; आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकले सहावे सुवर्णपदक, पदकांचे अर्धशतक झळकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले सहावे सुवर्णपदक पटकावले. हिंदुस्थानच्या महिलांनी बहरीन आणि चीनला मागे टाकत 4 बाय 400 मीटर रिलेमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. किरण, मचेतिरा पूवम्मा, प्राची आणि विथ्या रामराज या हिंदुस्थानच्या चौघींनी हे पदक जिंकले. हिंदुस्थानने ही शर्यत 3 मिनिटे 29.69 सेकंदांत पूर्ण केली. हिंदुस्थानला या शर्यतीत बहरीन कडवी झुंज देत होता. चीनही हिंदुस्थानच्या जवळपास होता. पण हिंदुस्थानच्या महिलांनी अखेरपर्यंत आपले वर्चस्व राखले आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. बहरीनने रौप्य, तर चीनने कांस्यपदक पटकावले.

महिलांच्या रिलेमध्ये हिंदुस्थानचे वर्चस्व

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 4 बाय 400 मीटर रिलेमध्ये हिंदुस्थानने नेहमीच वर्चस्व गाजवले आहे. 2002 पासून झालेल्या सात आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये या प्रकारातील हिंदुस्थानचे हे सहावे पदक आहे. हांगझू येथे झालेल्या स्पर्धेत बहरीनने सुवर्णपदक, तर हिंदुस्थानने रौप्यपदक जिंकले होते. आता पुन्हा एकदा हिंदुस्थानच्या महिला संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत रिलेमध्ये विजेतेपद पटकावले आहे.

ऍथलेटिक्समध्ये एकमेव सुवर्णपदक

मंगळवार हा आशियाई क्रीडा स्पर्धेतील ऍथलेटिक्स स्पर्धांचा अंतिम दिवस होता. ऍथलेटिक्समधील हिंदुस्थानचे हे एकमेव सुवर्णपदक आहे. 2022 च्या हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानने ऍथलेटिक्समध्ये सहा सुवर्णपदके जिंकली होती. यावेळी हिंदुस्थानने एक सुवर्ण, नऊ रौप्य आणि 14 कांस्यपदके जिंकून एकूण पदकांची संख्या 24 वर नेली आहे.