
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील आणखी दोन प्लॅटफॉर्मवरील पुनर्विकास कामासाठी तब्बल 75 दिवसांचा ट्रफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक काळात प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 15 या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील मेल-एक्सप्रेस गाडय़ांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. संबंधित गाडय़ा सीएसएमटीऐवजी दादर किंवा ठाणे येथून चालवण्यात येणार आहेत.
रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाद्वारे (आरएलडीए) सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाचे पहिल्या टप्प्यातील काम केले जात आहे. याअंतर्गत यापूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक 16 व 17 वर ब्लॉक घेण्यात आला होता. त्यापाठोपाठ आणखी दोन प्लॅटफॉर्मच्या पुनर्विकास कामाला सुरुवात केली जात आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 व 15 तसेच स्टेब्लिंग लाईन 15 वर पायाभरणीचे काम आणि इतर कामे केली जातील. यासाठी 1 ऑक्टोबरपासून काम पूर्ण होईपर्यंत अनेक ‘अप’ दिशेच्या मेल/एक्सप्रेस गाडय़ांची सेवा दादर किंवा ठाणे येथेच समाप्त केली जाईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाडय़ा
बल्लारशाह-सीएसएमटी नंदीग्राम एक्सप्रेस, हावडा-सीएसएमटी एक्सप्रेस, अमरावती-सीएसएमटी एक्सप्रेस, भुवनेश्वर- सीएसएमटी कोणार्प एक्सप्रेस, मडगाव-सीएसएमटी तेजस एक्सप्रेस, बिदर-सीएसएमटी एक्सप्रेस, लातूर-सीएसएमटी एक्सप्रेस या सर्व गाडय़ा दादर येथून चालवणार असून मंगळुरू- सीएसएमटी एक्सप्रेस ही गाडी ठाण्यातून चालवण्यात येणार आहे.
लांब पल्ल्याचा प्रवास डोकेदुखीचा ठरणार
सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत याआधी प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17 वर ब्लॉक घेण्यात आला. ब्लॉकला वारंवार मुदतवाढ दिली गेली. आता आणखी दोन प्लॅटफॉर्म वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत. त्यामुळे मुंबईतून लांब पल्ल्याचा प्रवास करणे डोकेदुखीचे ठरणार आहे.



























































