मुंबईतील कयानी बेकरीचा परवाना रद्द, एफडीएची अन्य 12 आस्थापनांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) प्रसिद्ध कयानी बेकरीचा परवाना रद्द केला आहे. तसेच आस्थापनास अन्नपदार्थांची खरेदी, उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, विक्री व वितरण तत्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कारवाईसह एफडीएने मुंबईतील अन्य 12 आस्थापनांवरदेखील बडगा उगारला आहे.

एफडीएला अन्न तयार करणे व साठवणूक क्षेत्रात मांजर, उंदरांची विष्ठा, जिवंत माशा, मृत झुरळे, फ्रिजमध्ये रक्ताचे डाग व प्रक्रिया विभागात उघडे मॅनहोल आढळून आले. तसेच अन्नपदार्थ जमिनीवर ठेवणे, कच्चे पीठ वृत्तपत्र कागदाने झाकणे, कर्मचाऱयांकडून आवश्यक स्वच्छता व पीपीईचा वापर न करणे, कच्चे व तयार अन्नपदार्थांचे अयोग्य विभाजन अशा गंभीर त्रुटी आढळल्याने एफडीएने कयानी बेकरीचा परवाना तत्काळ निलंबित केला आहे.

या आस्थापनांवर बडगा

कुलाबा स्वीट मार्ट, धारावीतील अरुण विलास फरसाण, परळमधील रुची व्हेज रेस्टॉरंट, क्यूएसआर ब्रँड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, फोर्टमधील अस्त्र कॉर्पोरेशन, वांद्रे पश्चिमेकडील टिफिन, सांताक्रुझ पश्चिमेकडील युनायटेड बेकरी ऍण्ड स्टोअर्स, जोगेश्वरी पश्चिमेकडील श्री पद्मावती एंटरप्रायझेस, खार पश्चिमेकडील हॉटेल पुरंदर विलास, विलेपार्ले येथील ‘डॅफोडिल्स फास्ट इन, लोअर परेल येथील ‘सबवे’, चेंबूर येथील ‘एस. एस. कॅटरर्स’चा या सर्व आस्थापनांचा परवाना एफडीएने निलंबित केला आहे.