
गुलवीर सिंगने आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपले तिसरे पदक जिंकत हॅटट्रिक साजरी केली. त्याने पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत तिसरे स्थान पटकावले. त्याने ही शर्यत 13ः32.75 मिनिटांत पूर्ण केली. बहरीनच्या बिरहानू बालेव्हने 13ः30.79 मिनिटांत शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले. जपानच्या तोमोनोरी यामागुचीने 13ः31.43 मिनिटांत शर्यत पूर्ण करून रौप्यपदक पटकावले.
गुलवीरने लेव्ही पिंटोच्या विक्रमाची केली बरोबरी
या कांस्यपदकापूर्वी गुलवीर सिंगने आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये दोन रौप्यपदके जिंकली होती. त्याने पुरुषांच्या 10,000 मीटर आणि 1500 मीटर शर्यतीत दुसरे स्थान पटकावले होते. या पदकासह 28 वर्षीय गुलवीर सिंग हा मैदानी खेळांमध्ये एकाच आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन पदके जिंकणारा दुसरा हिंदुस्थानी पुरुष खेळाडू ठरला आहेत. यापूर्वी 1951 मध्ये दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या लेव्ही पिंटो यांनी 100, 200 मीटरमध्ये सुवर्णपदक आणि 4 बाय 100 मीटर रिलेमध्ये रौप्यपदक जिंकले होते.
पी. टी. उषा यांची पाच पदके
पी. टी. उषा यांनी 1986 मध्ये सेऊल येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत चार सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले होते. गुलवीरचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे एकूण चौथे पदक आहे. गेल्या वेळी झालेल्या आशियाई स्पर्धेत 1000 मीटरच्या शर्यतीत त्याने कांस्यपदक जिंकले होते.
पुरुषांच्या रिलेमध्ये कांस्य कमाई
हिंदुस्थानने पुरुषांच्या 4 बाय 400 मीटर रिलेमध्ये 3ः01.61 या हंगामातील सर्वोत्तम वेळेसह कांस्यपदक जिंकले. जपानने 3ः00.75 वेळेसह सुवर्णपदक जिंकले, तर कतारने 3ः00.93 वेळेसह रौप्यपदक पटकावले.
मिश्र रिलेमध्ये सर्वोत्तम वेळेसह कांस्यपदक
हिंदुस्थानने 4 बाय 100 मीटर मिश्र रिलेमध्ये 41.06 सेकंदांच्या मोसमातील सर्वोत्तम वेळेसह कांस्यपदक पटकावले. हिंदुस्थानच्या संघाने तिसरे स्थान मिळवले. चीनने 40.78 सेकंदांच्या वेळेसह सुवर्णपदक जिंकले.

























































