Jammu Kashmir – कठुआमध्ये जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; 4 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात सीआयएसएफच्या (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) एका जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झाला. घटनेनंतर कठुआ पोलिसांनी आरोपी जवानाला अटक केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, काही मुद्द्यांवरून सीआयएसएफच्या जवानांमध्ये वाद झाला होता. याच वादातून गोळीबार झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत कॉन्स्टेबल रफीक अहमद, कॉन्स्टेबल संदीप कुमार, असिस्टंट कमांडंट अंकित कुमार पांडे आणि सब-इन्स्पेक्टर लक्ष्मण सिंग यांचा मृत्यू झाला.

आरोपी जवानाची ओळख अभिदेश सिंग अशी झाली आहे. तो २००९ च्या तुकडीतील जवान असल्याचे सांगितले जात आहे. त्याने आपल्या अधिकृत एके-४७ रायफलमधून गोळीबार केला. सीआयएसएफच्या माहितीनुसार, त्याच्याकडे १५० काडतुसे होती. मिळालेल्या माहितीनुसार, कठुआ येथील एका वीज प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीआयएसएफच्या छावणीत ही घटना घडली. गोळीबारात चार जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.

घटनेची माहिती मिळताच कठुआ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपास सुरू केला असून, हा बाह्य हल्ला नसून एकाच दलातील जवानांमध्ये झालेला गोळीबार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गोळीबार नेमका कधी सुरू झाला, किती गोळ्या झाडण्यात आल्या आणि घटनेमागील नेमके कारण काय होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. सीआयएसएफकडूनही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू आहे.