Ratnagiri News – पांचाबे गायकवाडवाडी येथे बिबट्या मृतावस्थेत आढळला, वन विभागाने केले अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
मौजे पांचाबे गायकवाडवाडी (ता. संगमेश्वर) येथे रस्त्याच्या बाजूला एका नर बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना सोमवारी (दि. 28 सप्टेंबर) उघडकीस आली. कुंचाबे येथील नागरिक अविनाश भिकाजी टाकळे यांनी वन विभागाला दूरध्वनीद्वारे या संदर्भात माहिती दिली होती.
​माहिती मिळताच संगमेश्वर वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. प्राथमिक अंदाजानुसार, सदर नर बिबट्याचा मृत्यू साधारणतः 9 ते 10 दिवसांपूर्वी झाला असावा. त्यामुळे त्याचे संपूर्ण शरीर अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होते. ​कडवई येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची तपासणी केली. हा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तपासणीनंतर वन विभागाच्या नियमानुसार, घटनास्थळीच लाकडाची चिता रचून बिबट्याच्या कुजलेल्या अवयवांवर अग्निसंस्कार करण्यात आले आणि सर्व अवशेष पूर्णपणे नष्ट करण्यात आले.
​ही कारवाई रत्नागिरी-चिपळूणच्या विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड व रत्नागिरीचे परिक्षेत्र वनाधिकारी विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईदरम्यान संगमेश्वर-देवरुखचे वनपाल सागर गोसावी, आरवलीचे वनरक्षक सूरज तेली, साखरपाचे वनरक्षक सहयोग कराडे, फुणगुसचे वनरक्षक आकाश कडूकर, कुटगिरीच्या पोलीस पाटील तसेच प्राणीमित्र प्रणित टाकळे आणि शंकर जागुष्टे उपस्थित होते.