
एआय आणि डीपफेक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे सेलिब्रिटींच्या ओळखीचा गैरवापर होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एखाद्या व्यक्तीचा चेहरा, आवाज, छायाचित्र, नाव किंवा बोलण्याची खास शैली परवानगीशिवाय वापरून व्यावसायिक फायदा मिळवला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे 2022 पासून आतापर्यंत सुमारे 50 सेलिब्रिटींनी आपल्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित अधिकारांच्या संरक्षणासाठी न्यायालयाचे दार ठोठावले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेता विवेक ओबेरॉय, जान्हवी कपूर आणि आराध्या बच्चन यांच्याशी संबंधित प्रकरणांची एकत्रित सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणांची सुनावणी 30 सप्टेंबरपासून होणार आहे.
2022 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या प्रकरणापासून सुरू झालेली ही कायदेशीर लढाई आता अनेक कलाकारांपर्यंत पोहोचली आहे. अनिल कपूर, जैकी श्रॉफ, अरिजित सिंह, ऐश्वर्या राय बच्चन, सलमान खान, ऋतिक रोशन, अजय देवगण यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी आपल्या नावाचा, आवाजाचा आणि प्रतिमेचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.
एआय तंत्रज्ञानामुळे एखाद्या व्यक्तीचा चेहरा दुसऱ्या व्हिडीओवर लावणे, आवाजाची हुबेहूब नक्कल करणे आणि त्याने न बोललेली विधाने केल्याचा भास निर्माण करणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे डीपफेक आणि बनावट जाहिरातींबाबत चिंता वाढली आहे. हिंदुस्थानात पर्सनॅलिटी राइट्ससाठी स्वतंत्र आणि व्यापक कायदा नसल्याने न्यायालयांचे निर्णय या अधिकारांची व्याप्ती निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.



























































