पालघरमध्ये खड्ड्याचा बळी, दुचाकीस्वार वृद्धाला कंटेनरने चिरडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात विविध ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच आज एका खड्याने वृद्धाचा बळी घेतला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात खड्ड्यामुळे 75 वर्षीय ब्रीजमोहन निर्मल हे बाईकस्वार तोल जाऊन थेट कंटेनरच्या चाकाखाली आले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. नव्याने तयार केलेल्या फ्री लेफ्टच्या ठिकाणी काँक्रीट आणि डांबरी रस्त्याची पातळी समांतर नसल्याने मोठा खड्डा निर्माण झाला आहे. हा खड्डा अपघाताला आमंत्रण देत असून एका वृद्धाला नाहक आपला जीव गमवावा लागला.

पालघरच्या टेंभाडे गावात राहणारे ब्रीजमोहन निर्मल हे आज सकाळी आपल्या दुचाकीवरून मनोरच्या दिशेने पालघरकडे येत होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पोलीस चौकीजवळ असलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी गेल्याने त्यांचा तोल गेला. त्याच वेळी मागून येणाऱ्या कंटेनरच्या चाकाखाली ते आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

रस्त्याची पातळी समांतर नाही

गेल्या काही महिन्यांपासून चौकाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. बोईसरकडून मनोरकडे तसेच मनोरकडून पालघरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी चौकातील कोपरे रुंद करून फ्री लेफ्ट तयार करण्यात आला आहे. मात्र या कामादरम्यान पोलीस चौकीशेजारी काँक्रीटचा भाग आणि जुन्या डांबरी रस्त्याची पातळी समांतर करण्यात आलेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तक्रारी करूनही दुर्लक्ष

रस्त्याच्या पृष्ठभागात मोठी तफावत निर्माण झाल्याने वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यापूर्वीही या ठिकाणी अनेक दुचाकीस्वारांचा तोल गेल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील खड्ड्यांबाबत दक्ष नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर आज एका वृद्ध दुचाकीस्वाराचा खड्ड्यांमुळे मृत्यू झाला.