शिंदे गटाला धक्क्यावर धक्का; डॉक्टरांना मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेचा जामीन रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोंबिवलीतील महापालिका रुग्णालयातील डॉक्टर मारहाणप्रकरणी शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे याला सर्वोच्च न्यायालयाने आज जोरदार झटका दिला. उच्च न्यायालयाने म्हात्रेला दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. तसेच तीन दिवसांत शरण येण्याचे आदेश दिले.

म्हात्रे आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी जुलै महिन्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्राrनगर रुग्णायलात महिला परिचारिकांसह डॉक्टरांवर हल्ला केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक झाली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने काही अटींवर त्याला जामीन मंजूर केला होता. मात्र जामिनाच्या अटी जाचक असल्याचे सांगत म्हात्रेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, तर राज्य सरकारने स्वतंत्र याचिका दाखल करून म्हात्रेच्या जामिनाला आव्हान दिले होते.

न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी आज सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठाने म्हात्रेचा जामीन रद्द केला. वैद्यकीय कर्मचाऱयांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत हा स्पष्ट आणि कडक संदेश समाजात गेला पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. फिर्यादी डॉ. वैभव साळुंखे यांच्या वतीने अॅड. अभिनय अडसूळ यांनी बाजू मांडली. रमेश म्हात्रेच्या वतीने अॅड. सिद्धार्थ दवे यांनी युक्तिवाद केला. आरोपीने आधीच 19 दिवस तुरुंगात काढले आहेत, असे दवे म्हणाले. त्यावर, चांगले आहे. आणखी किमान दोन-तीन वर्षे आतच राहा, असे खंडपीठाने सुनावले.

न्यायालयाचे निरीक्षण

  • रमेश म्हात्रे तुरुंगाबाहेर असणे हे खटल्यात अडथळा आणणारे ठरू शकते.
  • म्हात्रेवर यापेक्षा गंभीर गुन्हा दाखल व्हायला नको होता का?
  • दुसरा कोणी असता तर त्याच्यावर लगेच ‘मकोका’ची कारवाई झाली असती.