
हिंदुस्थानने सोमवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये दिमाखदार कामगिरी करत देशाला चार पदके मिळवून दिली. मुरली श्रीशंकरने उंच उडीत दुसरे स्थान मिळवत रौप्यझेप घेतली. पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत गुलवीर सिंगची रौप्यधाव पाहायला मिळाली. विथ्या रामराजने महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत पी. टी. उषा यांचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत कांस्यपदकाची कमाई केली. 5000 मीटर शर्यतीत पारुल चौधरीने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत यशवीर सिंगने रौप्यपदक जिंकले तर रोहित यादवने कांस्यपदक पटकावले.
गुलवीर सिंगला रौप्यपदक
हिंदुस्थानच्या गुलवीर सिंगने पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले. गुलवीर अंतिम फेरीत आघाडीवर होता, परंतु शेवटच्या काही सेकंदात तो मागे पडला आणि दुसऱया स्थानावर राहिला. गुलवीरने 3ः36.72 मिनिटांची आपली सर्वोत्तम वेळ नोंदवली. जपानच्या काझुतो इझावाने 3ः36.35 वेळेसह सुवर्णपदक जिंकले. गुलवीर 0.37 सेकंदांनी पहिले स्थान मिळवण्यापासून चुकला. एका क्षणी गुलवीर आघाडीवर होता आणि युनूस शाह तिसऱया स्थानी होता,
मुरली श्रीशंकरची रौप्यझेप
हिंदुस्थानच्या मुरली श्रीशंकरने पुरुषांच्या लांब उडीत रौप्यपदक जिंकले. श्रीशंकर चौथ्या प्रयत्नादरम्यान जखमी झाला आणि त्याचे पुढचे दोन प्रयत्न चुकले, पण त्याने दुसऱ्या प्रयत्नांत 8.07 मीटर उडी मारून दुसरे स्थान पटकावले. श्रीशंकरला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती, परंतु दुखापतीमुळे त्याला ते जमले नाही. पण तरीही त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानला पदक मिळवून दिले. चीनच्या युहाओ शीने 8.17 मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले.
पुरुषांच्या भालाफेकीत दुहेरी यश; यशवीरला रौप्य, रोहितला कांस्य
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत हिंदुस्थानने दुहेरी यश मिळवले. या स्पर्धेत हिंदुस्थानने रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. यशवीर सिंगने 85.72 मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह रौप्यपदक जिंकले, तर रोहित यादवने 84.35 मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह कांस्यपदक पटकावले. श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेने 88.55 मीटरच्या कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राची अनुपस्थिती असूनही हिंदुस्थानने या स्पर्धेत दोन पदके जिंकण्यात यश मिळवल्याचे पाहायला मिळाले. या स्पर्धेत पुन्हा एकदा श्रीलंकेच्या रुमेशने बाजी मारत आपले निर्विवाद वर्चस्व दाखवून दिले.
रिलेची अंतिम फेरी गाठली
हिंदुस्थान 4 बाय 100 मीटर रिलेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. गुरिंदरवीर सिंग, अनिमेश कुजूर, अभिनय राजाराजन आणि हरिता भद्रा या चौघांनी आपल्या हीटमध्ये 41.54 सेकंदांची वेळ नोंदवून अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. या स्पर्धेची अंतिम फेरी 29 सप्टेंबर रोजी होणार आहे.
अविनाश साबळे ठरला अपयशी
हिंदुस्थानचा अविनाश साबळे पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये पदकापासून वंचित राहिला. साबळे 8ः21.67 मिनिटांच्या वेळेसह चौथ्या स्थानावर राहिला आणि त्याला पदक मिळवता आले नाही. साबळे सुवर्णपदक जिंकेल अशी अपेक्षा होती, परंतु त्याची कामगिरी निराशाजनक होती.
पुरुषांच्या रिलेमध्ये अंतिम फेरीत
हिंदुस्थान पुरुषांच्या 4 बाय 400 मीटर संघाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. धर्मवीर चौधरी, राजेश रमेश, मनू टी.एस. आणि जय कुमार या चौघांनी 3ः01.49 मिनिटांची वेळ नोंदवून आपल्या हीटमध्ये दुसरे स्थान पटकावले. अंतिम सामना मंगळवारी होणार आहे.
महिलांच्या रिलेमध्ये अपयश
महिलांच्या 4 बाय 100 मीटर रिलेमध्ये हिंदुस्थानने निराशाजनक कामगिरी केली. हिंदुस्थानी संघ चौथ्या स्थानावर राहिल्याने पदकापासून वंचित राहिला. तमन्ना, स्नेहा शानुवल्ली सत्यनारायणा, सुदेशना शिवंकर आणि अबिन्या राजाराजन या चौघींनी अंतिम फेरीत 43.57 सेकंदांची वेळ नोंदवून चौथे स्थान पटकावले. हिंदुस्थानचे पदक केवळ 0.05 सेपंदांनी हुकले.
विथ्या रामराजचे विक्रमासह कांस्यपदकावर शिक्कामोर्तब
हिंदुस्थानच्या विथ्या रामराजने महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकले. तिने 54.75 सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवून तिसरे स्थान पटकावले. आणखी एक हिंदुस्थानी खेळाडू अनु राघवन, 55.88 सेकंदांच्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह पाचव्या स्थानी राहिली. विथ्याने 1984 मध्ये प्रस्थापित झालेला पी. टी. उषा यांचा राष्ट्रीय विक्रम मोडला. तिने 400 मीटर अडथळा शर्यतीचा राष्ट्रीय विक्रमही मोडला आहे.
पारुल चौधरीने कांस्यपदक जिंकले
हिंदुस्थानच्या पारुल चौधरीने आशियाई क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक जिंकले. पारुलने महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत तिसरे स्थान पटकावून कांस्यपदक मिळवले. पारुलने 15ः14.61 वेळेसह तिसरे स्थान मिळवले. बहरीनच्या विन्फ्रेड यावीने 15ः10.18 वेळेसह सुवर्णपदक जिंकले, तर जपानच्या नोझोमी तनाकाने 15ः11.65 वेळेसह रौप्यपदक पटकावले. आणखी एक हिंदुस्थानी धावपटू सीमा, 15ः35.06 वेळेसह सहाव्या स्थानावर राहिली.
























































