
प्रशासन कसं निगरगठ्ठ झालंय याचा प्रत्यय पावलावर येत आहे. एका शाळेमध्ये शिक्षक नाही, विद्यार्थीनींनी आम्हाला शिकायचंय, अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या अशी मागणी करत बॉटल माईक रिपोर्टिंग केली. अखेर या मुलींच्या शाळेला शिक्षक देण्यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयातून चक्रे हलवावी लागली. त्यानंतर शिक्षण विभागाचे डोळे उघडले आणि तात्काळ पावले उचलत एका शिक्षकाची नियुक्ती केली.
बीड तालुक्यातील हिवरा पहाडी येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गेल्या काही दिवसांपासून गणित, विज्ञान आणि संगणक या महत्वाच्या विषयासाठी शिक्षकच उपलब्ध नव्हते. संगणकाचे यंत्र सामुग्री शिक्षकांविना धुळखात पडली होती. अनेकदा मागण्या करूनही शिक्षण विभाग दखल घेत नव्हते. यावर तोडगा काढण्यासाठी शाळेतील चिमुकल्या मुलींनी पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटलचा माईक बनवून शाळेच्या वर्गातूनच बातमीपत्र सादर केले. हा व्हिडिओ सोशल मिडियासह दै.‘सामना’च्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रकाशित झाला. या व्हिडिओची अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना दखल घ्यावी लागली. त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या आदेशानंतर निगरगठ्ठ शिक्षण प्रशासन खडबडून जागे झाले आणि तातडीने पावले उचलत शिवाजी जोगदंड या शिक्षकाची हिवरापहाडीच्या शाळेमध्ये नियुक्ती केली. हा प्रश्न त्या शाळेतील चिमुकल्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सुटला. इतर शाळांची अवस्था काय, शिक्षकांअभावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट लागत आहे. विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.




























































