Asian Games – ईशा सिंगची २५ मीटर पिस्तूल नेमबाजीत रौप्यपदकाला गवसणी; अटीतटीच्या शूट-ऑफमध्ये सुवर्णपदक निसटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची युवा नेमबाज ईशा सिंगने २५ मीटर पिस्तूल प्रकारात चमकदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावले आहे. थरारक आणि अटीतटीच्या लढतीत झालेल्या शूट-ऑफमध्ये ईशाला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली असली, तरी तिने आपल्या दमदार खेळाने हिंदुस्थानच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली आहे.

अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी हिंदुस्थानची ईशा सिंग आणि चीनची नेमबाज शिओ जियारिक्सुआन (Xiao Jiaruixuan) यांच्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. निर्धारित फेरीअखेर दोघींनीही ३८-३८ गुणांची बरोबरी साधली होती. त्यामुळे निकालासाठी खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या शूट-ऑफमध्ये शिओने ४-३ अशा फरकाने बाजी मारत सुवर्णपदक पटकावले, तर ईशाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत उत्तर कोरियाच्या किम ह्योन सुकने ३४ गुणांची नोंद करत कांस्यपदक मिळवले.